मुंबई : प्रिया फुके यांनी दिर, भाजप आमदार परिणय फुके आणि कुटुंबीयांविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून सोमवारी त्यांनी विधान भवनासमोर आंदोलन केले. मात्र, पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतले. दरम्यान, सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या जाचामुळे आपल्या दोन लहान मुलांचे भवितव्य टांगणीला लागल्याची खंत व्यक्त त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालून तात्काळ न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी प्रिया फुके यांनी केली आहे.
सत्ता, अधिकार, आर्थिक सुबत्ता असलेल्या अनेक घरांमधील स्त्रियांचा मानसिक छळ होत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. नागपूरमधील फुके कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आला आहे. आमदार परिणय फुके यांचा भाऊ आणि प्रिया फुके यांचे पती संकेत फुके यांचा सप्टेंबर २०२२ मध्ये मृत्यू झाला. संकेत यांच्या मृत्युनंतर काही महिन्यांनी प्रिया फुके यांनी सासरच्या मंडळींवर आरोप केले. पतीच्या मृत्युनंतर घरातील सदस्यांनी त्यांच्या बँकेतील सर्व पैसे काढून घेतले. तसेच, जमिनीच्या मालमत्तेतही हेराफेरी करून ती ताब्यात घेतल्याचे आरोप प्रिया फुके यांनी केले आहेत. शिवाय, अन्यायाविरोधात आवाज उठवल्यानंतर आपल्याला दोन लहान मुलांसह घरातून हाकलण्यात आल्याचा आरोप त्यांनी केल आहे.
आमदार परिणय फुके यांच्यावरही प्रिया यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. पतीच्या मृत्यूनंतर निर्माण झालेली आर्थिक कोंडी आणि सासरच्या मंडळींकडून सुरू असलेल्या छळामुळे त्यांना मुलांचे संगोपन करण्यात अडचणी येत आहेत. सासरच्या मंडळींकडून त्यांना घरात येण्यास मज्जाव करण्यात येत असून त्यांच्या मागावर सतत माणसे असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सातत्याने त्यांना बलात्काराच्या आणि ठार मारण्याच्या धमक्या देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी प्रिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चार वेळा भेट घेतली असून या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पोलिसांकडूनही त्यांना सहकार्य मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
गेल्या दीड वर्षांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वेळ मागत आहे. त्यांच्या एका शब्दावर माझ्या दोन मुलांना न्याय मिळेल. मात्र, दुर्दैवाने या प्रकरणाची दखल घेतली जात नाही. मुलांचे शाळेचे शुल्क सुमारे दोन लाख रुपये असून तीदेखील फुके कुटुंब भरत नाही. केवळ शाळा सुरू होताना पहिल्या सहामहिन्यांची शुल्क भरण्यात आले. दोन बहिणी आणि आई असे त्यांचे कुटुंब असून आर्थिक पाठबळ नसल्याने आर्थिक कोंडी होत आहे, असे प्रिया फुके यांनी सांगितले.
प्रिया फुके यांनी केलेल्या आरोपांबाबत रमा फुके यांनी नागपुरामध्ये पत्रकार परिषद घेतली आहे. तसेच, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून सर्व खटले कुटुंब न्यायालयात व जिल्हा न्यायालयात सुरू आहेत.- परिणय फुके, आमदार