वसईच्या पापडी येथील एका लॉज मध्ये २६ वर्षीय तरुणीची गळा दाबून हत्या करण्यात आली. हत्या करून तिचा प्रियकर फरार झाला आहे. आज (सोमवार) दुपारी ही घटना उघडकीस आली.
वसई पश्चिमेच्या पापडी येथे स्टेअस लॉज आहे. रविवारी दुपारी वसईत राहणारे एक जोडपे या लॉजमध्ये आले होते. ते रात्री मुक्काम करून सोमवारी सकाळी जाणार होते. सोमवारी रात्री जेवणासाठी त्यांच्या रूममधून फोन आला नव्हता. सकाळी देखील रूममधून कुठलाही फोन आला नव्हता. त्यानंतर सकाळी ११ वाजता रूम सोडण्याची वेळ झाली होती. तेव्हा कर्मचाऱ्यांनी दारवरील घंटी वाजवली मात्र आतून प्रतिसाद आला नाही. त्यामुळे लॉज व्यवस्थापनाने पोलिसांना बोलावले. पोलिसांनी दार उघडल्यावर तरुणीचा मृतदेह पलंगावर आढळला.
तिच्या डोक्यावर जड वस्तूने प्रहार केला होता तसेच गळा दाबून तिची हत्या केली गेली होती. तिचा प्रियकर रविवारी संध्याकाळी ५ वाजता निघून गेला होता. त्यामुळे दुपारी १ ते ५ या वेळेत ही हत्या करण्यात आली अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव करपे यांनी दिली. आरोपी तरुणाची ओळख पटली असून लवकरच त्याला अटक केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. हे जोडपे नियमित आमच्या हॉटेलमध्ये यायचे. त्यांचे लग्न ठरले होते असे लॉज मालक प्रकाश हेगडे यांनी सांगितले.