‘लोकसत्ता इकोफ्रेंडली घरगुती गणपती सजावट स्पर्धे’चा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : ‘इकोफ्रेंडली घरगुती गणपती सजावट स्पर्धे’त सहभागी होऊन सर्वच स्पर्धकांनी समाजासमोर पर्यावरण रक्षणाचा आदर्श ठेवला आहे. पर्यावरण संवर्धनासाठी केलेली छोटीशी कृती खूप मोठे बदल घडवू शकते. ‘लोकसत्ता’च्या या पर्यावरणस्नेही उपक्रमाची सर्वानी दखल घेऊन हा उपक्रम भारतभर राबवावा, असे मत मंगळवारी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे सचिव आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव प्रवीण दराडे यांनी व्यक्त केले.

‘लोकसत्ता’, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण व वातावरणातील बदल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २०२१ आणि २०२२ या वर्षांत इकोफ्रेंडली घरगुती गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव प्रवीण दराडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब जऱ्हाड, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे जनसंपर्क अधिकारी संजय भुस्कुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळा मंगळवारी झाला. या वेळी ‘लोकसत्ता’ मुंबईचे निवासी संपादक सिद्धार्थ खांडेकर यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. ‘इकोफ्रेंडली घरगुती गणपती सजावट स्पर्धेत भाग घेऊन पर्यावरण रक्षणाचे काम स्पर्धकांनी हाती घेतले आहे, ते मोलाचे आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती घडविणे सोपे आहे, पण त्याचे विघटन होणे कठीण असते. त्यामुळे जलचक्र बिघडते आणि एक चक्र बिघडले की बाकीची चक्रसुद्धा बंद पडतात. पर्यावरणाचे असंतुलन होणे हे सर्वात घातक असते. सर्व उत्सव साजरे करताना ते पर्यावरणस्नेही पद्धतीने साजरे करणे अत्यंत गरजेचे आहे, असे जऱ्हाड या वेळी म्हणाले.

 ‘वेद आणि उपनिषदांमध्ये अनेक श्लोकांमधून पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. आजचे पालक अनेक गोष्टींमध्ये मुलांना सहकार्य करतात, पण सणांचे महत्त्व काय याबद्दल त्यांना जागरूक ठेवत नाहीत. पंधरा वर्षांपासून आम्ही ‘लोकसत्ता’च्या माध्यमातून जे काम केले, त्याचा आज बहरलेला वृक्ष झाला आहे. या स्पर्धेला मिळणारा उदंड प्रतिसाद पाहून पुढील सहा वर्षांत त्याचा मोठा वटवृक्ष होणार आहे, अशी भावना भुस्कुटे यांनी व्यक्त केली.

 ‘‘मी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाचे आभार मानतो. एखाद्या उपक्रमाला सातत्याने पाठबळ देऊन पर्यावरणपूजक व पर्यावरणस्नेही लोकांचे स्वागत करून त्यांचा सत्कार करणे, हा खूपच चांगला उपक्रम आहे. गेली १५ वर्षे हा उपक्रम सुरू आहे. करोनाच्या अघोषित-घोषित संचारबंदी व टाळेबंदीनंतर गणेशोत्सव साजरा झाला. एक मोठा खंड पडल्यानंतर उत्सव साजरा करताना सहभागींनी पर्यावरणाचे भान राखले. तुम्ही केलेले काम आमच्यासाठी लाखमोलाचे आहे’’, असे मत खांडेकर यांनी प्रास्ताविकात व्यक्त केले.

 मान्यवरांच्या हस्ते प्रथम पारितोषिक विजेत्यांना ९,९९९ रुपये, सन्मानपत्र व मानचिन्ह, द्वितीय पारितोषिक ६,६६६ रुपये, सन्मानपत्र व मानचिन्ह, विशेष पारितोषिक २००१ रुपये, सन्मानपत्र व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल रेगे यांनी केले.

इकोफ्रेंडली घरगुती गणपती सजावट स्पर्धा २०२२ मधील विजेते

* मुंबई विभाग : प्रथम पारितोषिक : मन रेळे, द्वितीय पारितोषिक : श्रवण घोडके, उत्तेजनार्थ : अभ्यंग पाटील, अमित अक्रे, अमोल वैद्य, आदित्य नमये, दीप्ती पाटकर, फाल्गुनी काननी, स्वप्निल करंजेकर, गौरव सर्जेराव, जगदीश राज, मयूर देशपांडे, नंदकुमार हळदणकर, पराग ब्राह्मे, प्रसाद राणे, प्रतीक निकम, रुतुजा वैद्य, संजय खांडेकर, संजय वळुंज, संतोष पवार, शंकर शेरखाने, शिवानी मजुमदार, सिद्धेश सुरंगे, सुधाकर आंबोकर, स्वप्नजा अहेर, तुषार कहाणे, विश्वास महाशब्दे, यशोमन आपटे, किरण तरटे, दीपक बिरवाडकर, नीलेश पाताडे, पूनम कर्णिक, भावेश धावरे, रवींद्र माईन, रितेश शिवलकर, संतोष वर्टेकर, सुनीलदत्त सार्दळ, प्रसाद बिर्जे, दत्तात्रय चिव्हाणे, केतकी चौधरी, योगेश सोनावणे, हेमंत पाटील, श्रीकांत कळमकर, संजय कारंडे

इकोफ्रेंडली घरगुती गणपती ; सजावट स्पर्धा २०२१ मधील विजेते

* मुंबई विभाग : प्रथम पारितोषिक : गुरुदास कुंभार, द्वितीय पारितोषिक : गौरव सर्जेराव, उत्तेजनार्थ : अमित अक्रे, वैभवी शिंदे, राजेश कुलकर्णी, मकरंद पाठारे, अद्वैत जाधव, अमोल वैद्य, अनुप पांचाळ, अनुश्री प्रभुलकर, अश्लेषा पाटील, गणेश भोकरे, हर्षद निकम, ओमकार आयरे, ओंकार लिंगायत, पराग सावंत, प्रभाकर महागावकर, प्रसाद वेदक, रश्मी कदम, सचिन वराडकर, साहिल साटमकर, संजय खांडेकर, शिवानी मजुमदार, अंकुश माईन, अक्षय येवगे, अनिल महाजन, अभिनय पाटील, उमेश पोतनीस, प्रदीप पेडणेकर, श्रवण घोडके, संतोष वर्टेकर, सिद्धेश सुरंगे, श्रीराम महाजन, संजय वर्तक, संजय कारंडे, जितेंद्र अहिरराव, मंदार ताठे, सोनाली मयेकर, गिरीश जाधव, मृणाल साळुंखे, दीपक कदम, सचिन पाटील

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prize distribution ceremony of loksatta eco friendly home ganesh contest zws
First published on: 30-11-2022 at 06:24 IST