मुंबई:आणिक आगार ते गेटवे आॅफ इंडिया भुयारी मेट्रो ११ मार्गिकेला मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तेव्हा आता मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनकडून (एमएमआरसी) या मार्गिकेचा प्रस्ताव येत्या पंधरा दिवसात केंद्र सरकारच्या मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे. या मार्गिकेस केंद्र सरकारची मान्यता मिळाल्यास मार्गिका प्रत्यक्ष मार्गी लावला जाणार आहे. या मार्गिकेसाठी २४ हजार कोटींचा खर्च अपेक्षित असून हा निधी जायकाच्या (जपान इंटरनॅशनल को-आॅपरेशन एजन्सी) माध्यमातून उभारण्यात येणार आहे. ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाल्यास वडाळा ते गेटवे आॅफ इंडिया प्रवास अवघ्या काही मिनिटांत करता येणार आहे.
मेट्रो ११ मार्गिकेच्या उभारणीची जबाबदारी एमएमआरसीकडे देण्यात आली आहे. ही जबाबदारी आल्यानंतर एमएमआरसीने या मार्गिकेचे संरेखन, आराखडा आणि पर्यावरणी तसेच सामाजिक प्रभाव मूल्यांकन अभ्यास पूर्ण करत यासंबंधीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. अहवालावर नागरिकांकडून सूचना-हरकती मागविण्याची प्रक्रिया सुरु असून त्या सादर करण्याची मुदत बुधवारी संपुष्टात आली आहे. त्यामुळे पुढील एक-दोन दिवसात नेमक्या किती सूचना-हरकती आल्या हे स्पष्ट होईल.
दरम्यान या मार्गिकेचा प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. त्यानुसार मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत २४ हजार कोटी रूपयांच्या खर्चाच्या या मार्गिकेस मान्यता देण्यात आली आहे. ही मान्यता मिळाल्याने आता हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या मान्यतेसाठी येत्या १५ दिवसात केंद्राकडे पाठवला जाणार असल्याची माहिती एमएमआरडीएतील उच्च पदस्थ अधिकाऱ्याने दिली. केंद्राच्या मान्यतेसाठी किमान सहा महिन्यांला कालावधी लागण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारची मान्यता मिळाल्यानंतर ही मार्गिका प्रत्यक्ष मार्गी लावण्यासाठीची निविदा प्रक्रिया राबविण्यास सुरुवात करण्यात येईल.
अशी आहे मेट्रो ११ मार्गिका
एमएमआरसीच्या संरेखनानुसार आता मेट्रो ११ ही भुयारी मार्गिका आणिक आगार ते गेटवे आॅफ इंडिया अशा असेल तर या मार्गिकेचे लांबी १७.५१ किमी असेल. या मार्गिकेत १४ मेट्रो स्थानके असणार आहेत. १४ पैकी १३ मेट्रो स्थानके भुयारी असणार असून एक स्थानक जमिनीवर असेल. आणिक आगार, वडाळा आगार, सीजीएस वसाहत, गणेश नगर, बीपीटी रुग्णालय, शिवडी, हे बंदर, दारुखाना, भायखळा, नागपाडा जंक्शन, भेंडी बाजार, सीएसएमटी, हाॅर्मिनल सर्कल आणि गेट वे ऑफ इंडिया अशी ही १४ मेट्रो स्थानके आहेत. ही मार्गिका सेवेत दाखल झाल्यास यावरून सहा डब्यांच्या मेट्रो ताशी ८० किमी वेगाने धावेल.
या मार्गिकेवरून २०३१ मध्ये दिवसाला पाच लाख ८० हजार प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज एमएमआरसीने व्यक्त केला आहे. २०५५ पर्यंत दैनंदिन प्रवासी संख्या १० लाख १२ हजारांवर जाईल, असा दावा एमएमआरसीने केला आहे. या मार्गिकेतील कारशेड आणिक आगार आणि प्रतीक्षा नगर आगारातील १६ हेक्टर जागेवर प्रस्तावित करण्यात आले आहे. तर या मार्गिकेसाठी २४ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.