‘एमएमआरडीए’च्या बैठकीलाही निवडणुकीची किनार

निवडणूक येती शहरा..

मुंबई : मुंबई, ठाणे आणि आसपासच्या शहरांत येत्या काही महिन्यांत होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांची छाया मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) बैठकीवरही दिसून आली आहे. महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी विविध प्रकल्पांना मंजुरी देतानाच या प्रकल्पांसाठी हजारो कोटींची तरतूदही जाहीर करण्यात आली.

एमएमआरडीएने मेट्रो, मोनोरेल, सागरी मार्ग, पूर्वमुक्त मार्ग, उन्नत मार्ग अशा अनेक प्रकल्पांची आखणी केली आहे. आता मुंबई आणि ठाणे महापालिका निवडणुका जवळ आल्या असताना मुंबई आणि ठाण्यात नवीन प्रकल्पांचा धडका लावला आहे. नरिमन पॉइंट ते कफ परेड दरम्यानची वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी या मार्गावर दीड किमी लांबीच्या उन्नत मार्गाच्या बांधणीला मंजुरी देण्यात आली आहे. मुंबई आणि ठाणे अंतर कमी करून वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी एमएमआरडीएने पूर्वमुक्त मार्गाचा (ईस्टर्न फ्री वे) ठाण्यापर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईतील खड्डय़ांच्या प्रश्नावरून मुंबई महापालिकेला लक्ष्य केले जाते. आता मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी एमएमआरडीए सरसावली असून पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गाचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी ७०० कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च करण्यात येणार आहे. पश्चिम द्रुतगती मार्गाचे माहीम जंक्शन ते दहिसर टोलनाकादरम्यान काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. तर शीव जंक्शन ते माजीवाडा, ठाणे असे पूर्व द्रुतगती मार्गाचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण करून निवडणुकीच्या तोंडावर फेब्रुवारी.. मार्च २०२२ मध्ये कामाला सुरुवात करण्याचे नियोजन आहे. मुंबईबरोबरच ठाण्यासाठी अनेक प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे. पूर्व मुक्त मार्गाचा विस्तार ठाण्यापर्यंत करण्यात येणार आहे.

ठाण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सागरी मार्ग (कोस्टल रोड), बाह्यवळण रस्ता (बायपास), उन्नत मार्ग असे प्रकल्प आता हाती घेतले आहेत. घोडबंदर येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी बाळकुम ते गायमुख या मार्गाला मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी एमएमआरडीएने तब्बल एक हजार ३१६ कोटी रुपये निधीला मंजुरी दिली आहे. मुंबई, ठाणे किंवा नाशिकवरून कल्याण-डोंबिवलीकडे यायचे असेल वा जायचे असेल तर शिळफाटा वा कोन गावातून दुर्गाडी पूल असा वळसा घालावा लागतो. वाहनचालक, प्रवाशांची ही कसरत दूर करण्यासाठी कल्याण डोंबिवली ते टिटवाळापर्यंत कल्याण बायपास प्रकल्पातील तिसऱ्या टप्प्यात मोठागाव पूल ते गोिवदवाडी बायपास या रस्त्याच्या बांधकामास मंजुरी देण्यात आली आहे. ठाण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पूर्व द्रुतगती महामार्गावरील आनंद नगर ते साकेतदरम्यान ६.३० किमी लांबीचा उन्नत रस्ता बांधण्यासही मंजुरी देण्यात आली आहे.

हद्दवाढीचा प्रस्ताव

पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एमएमआरडीएच्या हद्दवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. एमएमआरडीएने ठाणे, रायगड आणि पालघरमधील ९८ गावांचा समावेश एमएमआरडीएच्या हद्दीत करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला आहे. यात नवी मुंबई क्षेत्रातील सिडकोच्या अखत्यारीत असलेल्या ‘नैना’ परिसराचा काही भागही समाविष्ट आहे. त्याचबरोबर एमएमआरमध्ये बीकेसीच्या धर्तीवर खोपटा, पोयनाड, खारबाव, बोईसर, नेरळ, कर्जत, अलिबाग आणि पेण अशी ही आठ विकास केंद्रे साकारण्यात येणार आहेत.