मुंबई :भारतात पुरुष आरोग्य हे अजूनही दुय्यम स्थानावरच असून, त्या अनुषंगाने प्रोस्टेट कॅन्सरचे वाढते प्रमाण हे सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. वयस्कर पुरुषांमध्ये दिसणारा हा कर्करोग आता ५० वर्षांखालील वयोगटातही आढळू लागला आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि नॅशनल सेंटर फॉर डिसीज इन्फॉर्मेटिक्स अँड रिसर्च (एनसीडआयआरी) यांनी नुकत्याच २०२३ मध्ये प्रसिद्ध केलेल्या कॅन्सर रजिस्ट्री अहवालानुसार भारतात ४२,६४० नवीन प्रोस्टेट कॅन्सरचे रुग्ण नोंदले गेले, तर २०२४ अखेरपर्यंत ही संख्या १.१५ लाखांवर गेल्याच दिसून येत आहे.
ग्लोबोकॉन २०२३च्या जागतिक अहवालानुसार प्रोस्टेट कॅन्सर भारतात पुरुषांमध्ये सातव्या क्रमांकाचा सर्वाधिक आढळणारा कॅन्सर आहे. विशेष म्हणजे २०२० च्या तुलनेत रुग्णसंख्येत तब्बल २४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. प्रोस्टेट कॅन्सरची झपाट्याने वाढत चाललेली ही समस्या मुख्यत्वे शहरी भागात अधिक आढळते. मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू या शहरांमध्ये नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढते आहे. २०२३ मध्ये महाराष्ट्रात एकट्या ५,१५० रुग्णांची नोंद झाली. जे २०२० च्या तुलनेत ६.९ टक्क्यांनी जास्त आहे. या कॅन्सरची धोकादायक बाजू म्हणजे निदानात होणारा विलंब. टाटा मेमोरियल सेंटर च्या अहवालानुसार, ७२ टक्के रुग्णांचे स्टेज-२ किंवा त्यापुढील टप्प्यावर निदान होताना दिसत असल्याचे टाटा कॅन्सर हॉस्पिटलमधील एका ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले.
या आजाराचे निदान करण्यासाठी जी प्रोस्टेट स्पेसिफिक अँटिजेन चाचणी वेळेत करणे अपेक्षित असतानाही पुरुषांमध्ये तिचा वापर अत्यंत मर्यादित आहे. २०२३ मध्ये फक्त १७ टक्के पुरुषांनी वयाच्या पन्नाशी नंतर ही चाचणी करून घेतल्याच एलसीडीआयआर च्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाल आहे. शहरी भागात जर चाचण्याचे प्रमाण अत्यल्प असेल तर ग्रामीण भागात काय परिस्थिती असेल याची कल्पना करता येऊ शकते. ग्रामीण भागत हे प्रमाण ५ टक्यांपेक्षाही कमी आहे.
भारतात वाढते संकट
भारतीय जीवनशैली, विशेषतः शहरी भागातील, हीदेखील या आजारास कारणीभूत ठरत आहे. एम्सच्या दिल्लीच्या २०२४ च्या अहवालानुसार, प्रोस्टेट कॅन्सर रुग्णांपैकी ४२ टक्के जण लठ्ठ, तर ३५ टक्के मधुमेह किंवा उच्च रक्तदाबाने त्रस्त होते. दारू व तंबाखू सेवनामुळेही हा त्रास वाढत असल्याचे दिसून येते.
मोजक्या रुग्णालयांत आधुनिक उपचार सुविधा
उपचाराच्या बाबतीत देशातील काही ठराविक रुग्णालयांमध्ये आधुनिक पद्धती उपलब्ध आहेत. टाटा मेमोरियलमध्ये रोबोटिक सर्जरी, एम्समध्ये ब्रेकीथेरपी, आणि जेआयपीएमईआरमध्ये लॅप्रोस्कोपिक प्रोस्टेटेक्टॉमी उपलब्ध आहे. परंतु ग्रामीण व निमशहरी भागात अशा सुविधांचा अभाव आहे. प्रधानमंत्री जनस्वास्थ्य योजनेत मोफत उपचार असले तरी एनएचएच्या २०२४ च्या आकडेवारीनुसारर केवळ ८ टक्के रुग्णांनी याचा लाभ घेतला. बाकी ९२ टक्के रुग्णांना खाजगी रुग्णालयांमध्ये काही लाखांपर्यंत खर्च करावा लागतो.
मोफत व सक्तीची चाचणी गरजेची
सर्वात गंभीर बाब म्हणजे जागरूकतेचा अभाव. एनसीडीआयआरच्या २०२३ च्या सर्वेक्षणानुसार नुसार ६० टक्के पुरुषांना प्रोस्टेट कॅन्सरची प्राथमिक लक्षण माहीतच नव्हती. वारंवार लघवी लागणे, लघवी करताना त्रास, रक्तमिश्र लघवी, पाठदुखी अशी लक्षणं असूनसुद्धा पुरुष आरोग्याबाबत उदासीनता मोठी असल्याचं यातून स्पष्ट होत. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटना आणि आयसीएमआरने २०२४ मध्ये शिफारस केली आहे की ५० वर्षांवरील प्रत्येक पुरुषासाठी दरवर्षी मोफत पीएसए चाचणी उपलब्ध करून देणं बंधनकारक करावं. तसेच ‘मेन्स हेल्थ मिशन’ अंतर्गत प्रोस्टेट आरोग्य सप्ताह, जिल्हास्तरीय कॅम्प्स, आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांत मोफत चाचण्या राबवणं आवश्यक आहे.आरोग्य मंत्रालयाने स्तन, गर्भाशय व तोंडाच्या कॅन्सरप्रमाणेच प्रोस्टेट कॅन्सरसाठी स्वतंत्र नियंत्रण कार्यक्रम सुरू करण्याची गरज आता प्रकर्षाने जाणवत असल्याचे टाटा कॅन्सर हॉस्पिलटलच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे.
यापुढे प्रोस्टेट कॅन्सर हा केवळ वृद्धांचा आजार आहे असे म्हणून चालणार नाही. लवकर निदान, आधुनिक उपचार सुविधा आणि समाजात जाणीव निर्माण केल्याशिवाय हे संकट आणखी गंभीर रूप धारण करेल. २०२४ मध्ये जे पावलं उचलू त्यावरच २०४० मध्ये लाखो पुरुषांच आरोग्य अवलंबून असेल. सरकार, आरोग्य संस्था आणि समाज या तिन्ही घटकांनी एकत्र काम न केल्यास हे संकट थोपवणं अशक्य होईल.