मुंबई : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना खेळवण्याच्या निर्णयाविरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून तीव्र विरोध दर्शविण्यात आला. त्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी राज्यभरात ठिकठिकाणी ‘माझं कुंकू, माझा देश’ आंदोलन पुकारत निदर्शने केली.

केंद्र सरकारने या सामन्याला परवानगी देणे म्हणजे त्यांच्या राष्ट्रभक्तीची दिवाळखोरी आहे. अमित शहा यांचे पुत्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अध्यक्ष जय शहा यांच्या दबावामुळेच हा सामना खेळला जात असल्याचा आरोप या वेळी ठाकरे गटाकडून करण्यात आला.

आशिया चषक स्पर्धेसाठी अबुधाबी येथे झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्याविरोधात राज्यभरात झालेल्या या आंदोलनात शिवसेना ठाकरे गटाला काही ठिकाणी मनसे आणि काँग्रेसचीही साथ लाभली. या सामन्याबाबत निषेध नोंदवताना बीसीसीआयला भीक लागली आहे असे सांगत अनेक ठिकाणी प्रतीकात्मकरीत्या वर्गणीही गोळा करण्यात आली. आम्ही वर्गणी देऊ पण सामना खेळू नका, अशी टीका या वेळी करण्यात आली.

केंद्र सरकारला ऑपरेशन सिंदूरची आठवण करून देण्यासाठी कुंकवाची डबीही पंतप्रधानांना पाठविण्यात आली. या वेळी एलईडी स्क्रीन तोडूनही निषेध नोंदवण्यात आला. शिवसेना ठाकरे गटाकडून हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये या सामन्याचे प्रसारण दाखविण्यास विरोधही दर्शविण्यात आला.

सरकारचे देशभक्तीचे ढोंग – संजय राऊत

पहलगाम हल्ल्यात आमचे २६ जण ठार झाले. त्यांच्या पत्नीच्या कपाळावरील कुंकू पुसले गेले. त्यावर नरेंद्र मोदी यांच्या सरकारने राजकीय ढोंग केले आहे. यापूर्वी अशा आंतरराष्ट्रीय सामन्यांतून भारताने माघार घेतली आहे. भाजपचे ‘पापा’ पाकिस्तानविरोधातील युद्ध थांबवू शकतात, युक्रेनचे वॉर थांबवू शकतात, पण भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना थांबवू शकत नाहीत का, असा सवालही त्यांनी केला. या सामन्याविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्राचा मंत्री भारत-पाक सामना पाहण्याची भाषा वापरत असेल तर ती राष्ट्रभक्त नागरिकाची भाषा नाही, अशी टीकाही त्यांनी केली. खेळाकडे खेळाच्या नजरेतून बघावे की न बघावे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. तो संविधानाने दिला आहे, असे विधान अजित पवार यांनी केले होते.