मुंबई : सोरायसिस हा एक असा रोग आहे ज्यामध्ये त्वचेवर लाल, खवलेयुक्त पुरळ येतात. हा केवळ एक त्वचेचा आजार नाही कारण, काही लोकांना सोरायसिससोबत सांध्यांमध्ये वेदना आणि सूज येते, ज्याला सोरायटिक संधीवात म्हणतात. योग्य वेळी निदान न केल्यास सांध्यांचे गंभीर नुकसान होते. सांधेदुखीच्या बाबतीत, विशेषतः सोरायसिस असलेल्या लोकांमध्ये, ज्यामुळे स्नायुंमध्ये कडकपणा आणि अपंगत्व येऊ शकते. या रोगाबीबत जागरूकता वाढवणे आणि वेळीच लवकर निदानाने रुग्णांना चांगले परिणाम मिळतात.

सोरायसिस हा एक स्वयंप्रतिकार रोग आहे जिथे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती अतिक्रियाशील होते, ज्यामुळे त्वचेच्या पेशी खूप लवकर वाढतात. यामुळे टाळू, कोपर, गुडघे किंवा पाठीच्या खालच्या भागात कोरडे, खाज सुटणारे, खपलीयुक्त पुरळ येतात. काही लोकांमध्ये, हीच रोगप्रतिकारक प्रतिक्रिया सांध्यांवर देखील हल्ला करते, ज्यामुळे सोरायटिक संधिवात होतो. सोरायसिस असलेल्या काही लोकांना सोरायटिक संधिवात देखील होऊ शकते, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

बऱ्याचदा सोरायटिक संधिवाताचा निदानास उशीर होतो कारण रुग्णांना असे वाटते की त्यांची सांधेदुखी ही त्यांच्या त्वचारोगाशी संबंधित नाही. बोटं, गुडघे किंवा घोट्यांमध्ये वेदन, सकाळच्या वेळी स्नायु कडक होणे जे २० मिनिटांपेक्षा जास्त काळाकरिता टिकून राहते, हाता-पायाची बोटं सूजतात, थकवा जाणवतो आणि शारीरीक हालचाली मंदावतात. सोरायसिसचे निदान झालेल्या ३५-६५ वयोगटातील १० पैकी ३ रुग्णांना सांधेदुखीच्या तक्रारी सतावतात आणि त्यांना सोरायटिक संधिवाताची शक्यता असते. उपचार न केल्यास सोरायटिक संधिवाताने सांध्यांमध्ये विकृती, कायमस्वरुपी सांध्यांचा कडकपणा आणि जीवनाची गुणवत्ता कमी होऊ शकते. लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास सांध्यांचे नुकसान होऊ शकते. म्हणूनच सोरायसिस असलेल्या लोकांना सांधेदुखीची सौम्य लक्षणे आढळल्यास त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असल्याचे ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. शफिउद्दीन नदवी यांनी सांगितले.

सोरायसिसच्या रुग्णांनाही सोरायटिक आर्थरायटिसचा धोका असू शकतो. अनेक रुग्णांना हे कळत नाही की त्यांचा सोरायसिस सारखा त्वचेचा रोग हा त्यांच्या सांध्यावरही परिणाम होऊ शकतो. सोरायसिसचे निदान झालेल्या २० ते ३० टक्के रुग्णांमधील १० पैकी १ रुग्ण सांधेदुखीची तक्रार करत असल्याचे आढळून आले, ज्यामुळे सोरायटिक आर्थरायटिसचा धोका वाढतो. ही एक प्रगतीशील स्थिती आहे आणि वेळीच उपचार न केल्यास, सांध्यांचे गंभीर नुकसान होते आणि दैनंदिन कामांसाठी कुटुंबातील इतर सदस्यांवर अवलंबून राहावे लागते. नियमित तपासणी आणि वेळीच व्यवस्थापनामुळे सांध्याचे आरोग्य टिकवून ठेवण्यास आणि रुग्णांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते असे जॉइंट आणि हिप रिप्लेसमेंट सर्जन डॉ. श्रीसनत राव सांगतात.

सोरायटिक आर्थरायटिसमध्ये प्रामुख्याने स्पाईन,हिप,गुडघे जाम होतात. रुग्णाला हालचाल करणे कठीण होऊन बसते. अर्थात सोरायसिस झालेल्या सर्वांनाच हा त्रास होतो असे नाही तर काहींनाच हा त्रास होतो. यासाठी योग्य औषधे, जीवनशैलीतील बदल आणि फिजिओथेरपीसह वेळीच उपचार हे दीर्घकालीन गुंतागुंत टाळू शकतातअसे केईएम रुग्णालयातील अस्थिलश्ल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ मोहन देसाई यांनी सांगितले. उपचारांमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी औषधं, संधीवात कमी करणारी औषध आणि सांध्यांच्या नुकसानाची गती कमी करण्यास मदत करणाऱ्या विशिष्ट उपचारांचा समावेश करण्यात येतो. नियमित व्यायाम, सांध्यांना अनुकूल अशा शारीरीक हालचाली, तणावाचे व्यवस्थापन आणि संतुलित आहाराने याचे व्यवस्थापन करता येते. सोरायसिस असलेल्या रुग्णांनी हा आजार लवकर लक्षात येण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करावी असेही डॉ देसाई म्हणाले.