मुंबई : म्हाडाच्या पुणे विभागीय मंडळ खेड आणि मुळशी तालुक्यातील दोन गावांमध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत १३ हजार ३०१ घरांची बांधणी करणार आहे. रोहकल आणि नेरे या गावांमध्ये सुमारे २१९४ कोटी रुपये खर्च करून १३ हजार ३०१ घरांची निर्मिती करण्यात येणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या या घरांच्या बांधणीचा प्रस्ताव सध्या म्हाडा प्राधिकरणाकडे प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे.
पुण्यातील घरांची वाढती मागणी लक्षात घेता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना परवडणाऱ्या दरात हक्काची घरे उपलब्ध करून देण्यासाठी पुणे मंडळाने पीएमएवाय योजनेअंतर्गत अधिकाधिक घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार खेड तालुक्यातील रोहकल आणि मुळशी तालुक्यातील नेरे गावात पीएमएवाय योजनेअंतर्गत १३ हजार ३०१ घरे बांधण्यात येणार आहेत.
१३ हजार ३०१ घरांपैकी आठ हजार घरे रोहकलमध्ये, तर ५३०१ घरे नेरेमधील असणार आहेत. अल्प आणि अत्यल्प गटासाठी ही घरे असणार आहेत. म्हाडाला रोहकलमधील घरांच्या निर्मितीसाठी आवश्यक ती जमीन राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. जमीन देण्यासाठी नेरे गावातील गावकऱ्यांचा विरोध होता. मात्र एका अटीवर जमीन हस्तांतरित करून घेण्यात पुणे मंडळाला यश आले आहे. दरम्यान, रोहकल येथील रहिवाशांचा या प्रकल्पाला विरोध होता. जमीन देण्यास विरोध होता. रहिवाशांच्या मागणीनुसार गृहनिर्मितीसाठी देण्यात आलेल्या जमिनीचा काही भाग आदिवासी कुटुंबांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.
रोहकल आणि नेरे गावातील या १३ हजार ३०१ घरांच्या बांधणीचा प्रस्ताव पुणे मंडळाकडून म्हाडा प्राधिकरणाकडे प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविण्यात आल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. परवानगी मिळाल्यानंतर हा प्रस्ताव राज्य सरकारच्या मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे. राज्य सरकारची परवानगी मिळाल्यानंतर या घरांच्या बांधणीच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. ही घरे तयार होऊन त्यांचे वितरण होण्यास काही वर्षे वाट पाहावी लागणार आहे.
साडेचौदा लाख आणि साडेएकोणीस लाखांत घरे
नेरे येथे ७.८८ हेक्टर जागेवर ५३०१ घरे बांधण्यात येणार आहेत. ही घरे ३३.४१ चौरस मीटर क्षेत्रफळाची असणार आहेत. या घरांसाठी म्हाडाने १९ लाख ५१ हजार रुपये अशी विक्री किंमती निश्चित केली आहे. तर रोहकल येथे १७.७६ हेक्टर जागेवर आठ हजार घरे बांधण्यात येणार असून ही घरे ३० चौरस मीटर क्षेत्रफळाची असणार आहेत. या घरांसाठी पुणे मंडळाने १४ लाख ५१ हजार रुपये विक्री किंमत निश्चित केली आहे. त्यामुळे इच्छुकांना साडेचौदा ते साडेएकोणीस लाखांत घरांचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी उपलब्ध होणार आहेत.