राज्यातील स्वाईन फ्लूचा प्रसार वाढत असल्याने प्रतिबंधासाठी फ्लूच्या सुमारे एक लाख लसींचा साठा राज्याने उपलब्ध केला आहे. गर्भवती महिला, आरोग्य कर्मचारी अशा जोखमीच्या गटांसाठी ही लस जिल्ह्यांना पाठविण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात जुलैपासून स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णसंख्या १७३ च्याही पुढे गेली आहे, तर नऊ जणांचा मृत्युही झाला आहे. करोनाकाळात स्वाईन फ्लूचा प्रसार तुलनेत कमी होता. त्यामुळे बाधित आणि मृतांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात घट झाली होती. परंतु करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर स्वाईन फ्लूचा प्रसार पुन्हा वाढायला सुरूवात झाली आहे. स्वाईन फ्लूचा जास्त धोका गर्भवती महिला, ६५ वर्षांवरील व्यक्ती, दमा, हृदयविकार, मूत्रपिंडाचे आजार, मधुमेह, चेतासंस्थेचे विकार इत्यादी दीर्घकालीन आजार असलेले रुग्ण, दीर्घकाळ औषधे घेतल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेले रुग्ण आणि अतिस्थूल व्यक्तींना आहे. या आजारापासून प्रतिबंधासाठी इंजेक्शनद्वारे द्यायची आणि नेसल स्प्रे स्वरुपातील लस उपलब्ध आहे.

आरोग्य विभागामार्फत दरवर्षी काही लसींचा साठा खरेदी करून सरकारी रुग्णालयांमध्ये वितरित करण्यात येतो. विशेषत: आरोग्य कर्मचारी, गर्भवती मातांना ही लस देण्यात येते. यावर्षी सुमारे एक लाख लसींचा साठा खरेदी करण्यात आला असून त्याचे जिल्ह्यांना वितरणही सुरू केले आहे. ठाणे विभागात साठा पाठविला असून मुंबईलाही हा साठा लवकरच प्राप्त होईल, असे साथरोग सर्वेक्षण विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.

वातावरण बदलाचा परिणाम –

दरवर्षी पावसाळ्यात आणि थंडीमध्ये स्वाईन फ्लूचा प्रसार वाढतो. मागील दोन वर्षांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होता. साधारण एक विषाणू प्रभावशाली असल्यास अन्य विषाणूंचा प्रभाव कमी होतो. परंतु आता डेंग्यू, स्वाईन फ्लू या अन्य विषाणूंचा प्रादुर्भाव पुन्हा वाढायला सुरूवात झाली आहे, याचा अर्थ करोनाचा प्रभाव आता कमी होत असल्याचे हे लक्षण आहे. यावर्षी जुलै महिन्यात सर्वत्र सलग सुरू असलेला जोरदार पावसामुळे वातावरणातही बदल झाले. असे वातावरण विषाणूच्या वाढीसाठी पोषक असल्यामुळेही प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढल्याचे डॉ. आवटे यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Purchase of one lakh vaccine stocks of swine flu distribution started in districts mumbai print news msr
First published on: 02-08-2022 at 13:41 IST