मुंबई : बेस्ट एम्प्लॉइज को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या संयुक्त उत्कर्ष पॅनेलच्या पराभवाला कर्मचाऱ्यांची नाराजी कारणीभूत ठरली . शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या एकीची ही पहिली चाचणी म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात होते. आता महापालिका निवडणुकीतील कामगिरीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या निवडणुकीत कामगार नेते शशांक राव यांच्या पॅनेलचे १४ उमेदवार निवडून आले . तर आमदार प्रसाद लाड यांच्या पॅनेलचे सात जण विजयी झाले. ठाकरे बंधूंच्या पॅनेलचा एकही उमेदवार यशस्वी झाला नाही.
शिवसेनेला जो फटका बसला त्याचे आता विश्लेषण सुरू आहे. बेस्ट उपक्रमात २०१९ मध्ये कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपातून पहिल्याच दिवशी शिवसेनेने माघार घेतली होती. त्याचा रोषही कर्मचाऱ्यांच्या मनात कायम होता. शिवसेनाप्रणीत बेस्ट कामगार सेनेत सुरू असलेला एककल्ली कारभार, उपक्रमातील संघटनेतील नेतृत्वात न झालेला बदल, मुंबई महापालिकेत अनेक वर्षे सत्तास्थानी असतानाही बेस्ट उपक्रमावर ओढवलेली हलाखीची स्थिती, निवृत्त कर्मचाऱ्यांची रखडलेली देणी आदींमुळे नाराजीचा स्फोट निकालातून दिसला. त्यातच उमेदवारी अर्जांच्या वेळी माघारीमुळे काही मंडळींनी उघडउघड, तर काहींनी छुप्या पद्धतीने बंडखोरी केली. त्याचा फटका निवडणुकीत शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या संयुक्त उत्कर्ष पॅनेलला बसला.
बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या बेस्ट एम्प्लॉइज को-ऑप. सोसायटीची निवडणूक नुकतीच पार पडली. नऊ वर्षांनी सोसायटीची निवडणूक घेण्यात आली. बेस्ट एम्प्लॉइज को-ऑप. क्रेडिट सोसायटीमध्ये २००६ पूर्वी शिवसेनेची सत्ता होती. दिवंगत कामगार नेते शरद राव यांच्या दि बेस्ट वर्कर्स युनियनने २००६ मध्ये सोसायटीच्या निवडणुकीत विजय मिळविला आणि शिवसेनेला सत्ता गमवावी लागली. मात्र २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने पुन्हा सोसायटी काबीज केली होती.
यंदाच्या निवडणुकीच्या रिंगणात शिवसेना (ठाकरे) आणि मनसेप्रणीत उत्कर्ष पॅनेल, बेस्ट वर्कर्स युनियनचे शशांक राव पॅनेल, आमदार प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांचे सहकार समृद्धी पॅनेल, भाजपप्रणीत कर्मचारी संघटनेचे सहकार विकास पॅनेल आणि कामगार नेते विठ्ठल गायकवाड यांचे परिवर्तन पॅनेल उतरले होते. शिवसेना (ठाकरे) आणि मनसे एकत्र आल्यामुळे भाजपशी संबंधित मंडळी दंड थोपटून या निवडणुकीच्या रिंगणात उतरली.
अंतर्गत नाराजीचा फटका
उत्कर्ष पॅनेलतर्फे या निवडणुकीसाठी २१ पदांसाठी ७७ जणांकडून उमेदवारी अर्ज भरून घेण्यात आले होते. निवडणुकीच्या रिंगणात २१ उमेदवारांनाच संधी मिळाली. उर्वरित उमेदवारांचे अर्ज मागे घेण्यात आले. तर अर्ज मागे घ्यावा लागल्याचा राग मनात ठेवून काही मंडळींनी या पॅनेलविरोधात काम केले. अशी विविध कारणे या पराभवाला कारणीभूत ठरली.
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीचे राजकीयीकरण करायला नको होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ते केले. मात्र, मतदारांनी त्यांना नाकारले. विजयी पॅनेलचे प्रमुख शशांक राव आणि प्रसाद लाड हे दोघेही आमचेच आहेत. -देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री