मुंबई : बारसू येथे हरित तेलशुध्दीकरण प्रकल्प उभारण्यासाठीची जागा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच निवडली असून त्यांनी तसे पत्रच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले होते याकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी लक्ष वेधले. त्यामुळे आता या प्रकल्पास विरोध कशासाठी आणि ही सुपारी कोणाकडून, असे सवाल फडणवीस यांनी केले आहेत. शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांशी आम्ही चर्चा करु, मात्र राजकारणासाठी विरोध खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यावर असलेले फडणवीस तेलशुध्दीकरण प्रकल्पासंदर्भात भूमिका मांडताना म्हणाले की, ठाकरे गटाने आधी आरे येथील मेट्रो कारशेडला विरोध केला, नंतर समृद्धी महामार्ग आणि वाढवण बंदर प्रकल्पास विरोध केला. आता हरित तेलशुध्दीकरण प्रकल्पास विरोध करण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या तीन पेट्रोलियम कंपन्या एकत्र येऊन हा प्रकल्प उभारत असून ठाकरे यांनी सुरुवातीपासूनच त्यास विरोध केला. मात्र सत्तेत आल्यावर हा प्रकल्प बारसूला करायचे, हे त्यांनीच ठरविले आणि पंतप्रधानांना पत्र पाठविले. आता काम सुरु झाल्यावर पुन्हा विरोध कशासाठी, असा सवालही फडणवीस यांनी केला. विरोधकांचा आम्ही सन्मान करतो. त्यांच्याशी चर्चा करायला आणि त्यांचे गैरसमज दूर करायला आम्ही तयार आहोत. पण राजकारणासाठी जे विरोध करीत आहेत, तो आम्ही सहन करणार नाही. गुजरातमधील जामनगरमध्ये तेलशुध्दीकरण प्रकल्प असून त्यापासून जवळच मोठय़ा प्रमाणावर आंबा लागवड आहे आणि तो आंबा उत्तम दर्जाचा असून निर्यातही होतो. तेलशुध्दीकरण प्रकल्पामुळे आंबा, काजू किंवा कोणत्याही पिकांचे नुकसान होत नाही, हे सिद्ध झाले आहे.
(राजापूर तालुक्यातील बारसू परिसरात प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प माती परीक्षणाच्या विरोधात मंगळवारी स्थानिकांनी आंदोलन केले.)