मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या विधि शाखेच्या तृतीय वर्ष पाचव्या सत्र परीक्षेत (एटीकेटी) विद्यार्थ्यांना जुन्या अभ्यासक्रमाप्रमाणे प्रश्नपत्रिका देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही बाब परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर तब्बल अर्ध्या तासाने नवीन अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका देण्यात आली. मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला.

मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रावर असणाऱ्या बोधचिन्हावर ‘University of Mumbai’ ऐवजी ‘University of Mumabai’ असा उल्लेख करण्यात आल्याचे अलीकडेच उघडकीस आले होते. या घोळानंतर मुंबई विद्यापीठाकडून विधि शाखेच्या विद्यार्थ्यांना जुन्या अभ्यासक्रमाप्रमाणे प्रश्नपत्रिका देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणानंतर मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून विद्यार्थी संघटनांकडून टीकेचे ताशेरे ओढले जात आहेत. विधि शाखेची तृतीय वर्ष पाचव्या सत्राची (एटीकेटी) ‘कामगार कायदे आणि औद्योगिक संबंध – २’ या विषयाची परीक्षा मंगळवार, ८ एप्रिल रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १ या वेळेत होती. मात्र जुन्या अभ्यासक्रमाप्रमाणे प्रश्नपत्रिका देण्यात आल्याचे परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर तब्बल अर्ध्या तासाने सकाळी ११ वाजता नवीन अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका देऊन परीक्षेची वेळ दुपारी १.३० पर्यंत करण्यात आली. मात्र ‘मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यी संभ्रमात पडले आणि ‘कामगार कायदे आणि औद्योगिक संबंध – २’ या विषयाची परीक्षा देताना गोंधळ उडाला. हा घोळ घालणाऱ्या संबंधितांवर मुंबई विद्यापीठ प्रशासन कारवाई करणार का ?, जेणेकरून भविष्यात विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही’, असे एका विद्यार्थ्यांने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले.

‘मुंबई विद्यापीठ परीक्षा विभाग आणि आयडॉलच्या गलथान कारभारासाठी एक बैठक आयोजित करण्याची मागणी युवा सेना अधिसभा सदस्य सातत्याने करीत आहेत. परंतु विद्यापीठ प्रशासन त्याकडे काणाडोळा करीत आहे. आता विधि शाखेच्या विद्यार्थ्यांना जुन्या अभ्यासक्रमाप्रमाणे प्रश्नपत्रिका देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे परीक्षा विभागाकडून गोंधळाची मालिका सुरूच आहे. नैतिकतेची जबाबदारी घेऊन परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक राजीनामा देणार का ?’, असा सवाल ठाकरे गटाच्या युवा सेनेचे अधिसभा सदस्य प्रदीप सावंत यांनी उपस्थित केला आहे.

मुंबई विद्यापीठाकडून चुकीची कबूली

विधि शाखेच्या तृतीय वर्ष पाचव्या सत्राअंतर्गत (एटीकेटी) ‘कामगार कायदे आणि औद्योगिक संबंध – २’ या विषयाची परीक्षा मंगळवार, ८ एप्रिल रोजी सकाळच्या सत्रात होती. हस्तलखिते कक्षामधून सकाळी ९.३० मिनिटांनी प्रश्नपत्रिका पाठविण्यात आली. परंतु सदर प्रश्नपत्रिका जुन्या अभ्यासक्रमाप्रमाणे असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तात्काळ महाविद्यालयांना कळविण्यात आले. संबंधित प्रश्नपत्रिकेची तपासणी केल्यानंतर प्रश्निकांकडून जुन्या अभ्यासक्रमाप्रमाणे प्रश्नपत्रिका जमा करण्यात आल्याचे लक्षात आले. त्यानंतर तात्काळ संबधित प्रश्नपत्रिकेची लिंक बंद करून नवीन प्रश्नपत्रिका पाठविण्यात आली आणि विद्यार्थ्यांना अतिरिक्त ३० मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला. तसेच सर्व महाविद्यालयांना फोन करून सूचनाही देण्यात आल्या, असे मुंबई विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले.