मुंबई : मणिपूर येथून निघालेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रेचे उद्या, मंगळवारी महाराष्ट्रात आगमन होत आहे. नंदुरबारमध्ये त्यांचे जोरदार स्वागत करण्याची तयारी प्रदेश काँग्रेसने केली आहे.

भारत जोडो न्याय यात्रेची सुरुवात १५ जानेवारीला मणिपूरमधून करण्यात आली. ही यात्रा १५ राज्ये, १०० जिल्हे, ११० लोकसभा मतदारसंघातून ‘भारत जोडो न्याय यात्रा, न्याय का हक मिलने तक’ या घोषवाक्यासह मार्गक्रमण करीत आहे. यात्रेचा मंगळवारी १२ मार्च रोजी दुपारी २ वाजता नंदूरबार जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश होत आहे. त्यानंतर १३ मार्चला धुळे, मालेगाव, १४ मार्चला नाशिक, १५ मार्च रोजी पालघर, ठाणे असा प्रवास करत ही यात्रा १६ मार्च रोजी मुंबईत दाखल होणार आहे. १७ मार्चला भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप शिवाजी पार्कवर होत असून, त्यावेळी होणाऱ्या जाहीर सभेने लोकसभा निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार आहे.

हेही वाचा >>> बच्चू कडू यांचे अध्यक्षपद वाचविण्यासाठी अध्यादेश

भारत जोडो न्याय यात्रेसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीने जय्यत तयारी केली असून मुंबईत राहुल गांधी व न्याय यात्रेचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. रविवारी, १७ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेला इंडिया आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. सोमवारी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. वर्षां गायकवाड, आमदार अमिन पटेल, अस्लम शेख आदी नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना जाहीर सभेचे निमंत्रण दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुरक्षा व्यवस्थेबाबत महासंचालकांची भेट

भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाची शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आलेली जाहीर सभा, तसेच राहुल गांधी यांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवर, वर्षां गायकवाड यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.