मुंबईः शहरातील दुग्धालयांमध्ये पनीर म्हणून विकण्यात येणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या व आरोग्यास अपायकारक चीझ ॲनालॉग पदार्थाविरोधात मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली. सी. बी. कंट्रोल, गुन्हे शाखा व अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफडीए) संयुक्त कारवाईत तब्बल ५५० किलो चीझ ॲनालॉग जप्त करण्यात आले.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, ॲन्टॉप हिल पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दुग्धालयांमध्ये चीझ ॲनालॉग पदार्थाची “पनीर” म्हणून विक्री होत असल्याचे उघडकीस आले. जी.टी.बी. नगर, ॲन्टॉप हिल परिसरात सोमवारी छापा टाकण्यात आला. यावेळी “ओम कोल्ड्रींक हाऊस” आणि “श्री गणेश डेअरी” तसेच दुकानाबाहेर उभ्या असलेल्या सुझुकी सुपर कॅरी टेम्पोमधून एकूण ५५० किलो निकृष्ट दर्जाचे पनीर जप्त करण्यात आले.
भारतात चीझ ॲनालॉगच्या विक्रीस कठोर नियम आहेत. एफएसएसएआयच्या नियमानुसार जर उत्पादनात खरे चीज नसेल आणि ते दिसायला चीजसारखे असेल तर त्यावर “चीझ ॲनालॉग” असे स्पष्ट लेबल लावणे बंधनकारक आहे. परंतु संबंधितांनी हा नियम धाब्यावर बसवला होता. चीझ ॲनालॉग हे दुधाऐवजी दुधाची पावडर, हलक्या प्रतीचे पामतेल व केमिकल्सच्या मिश्रणातून तयार केले जाते. हे आरोग्यास अपायकारक असून खऱ्या मलई पनीरच्या तुलनेत यामध्ये प्रथिने, कॅल्शिअम व चांगल्या प्रतिचे स्निग्ध पदार्ध कमी प्रमाणात असतात.
मुंबईतील रेस्टॉरंट, हॉटेल्स, दुग्धालये व खानपान व्यावसायिकांना तसेच स्थानिक ग्राहकांना हे निकृष्ट दर्जाचे पनीर “मलाईयुक्त पनीर” या नावाने स्वस्त दरात विकले जात होते. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
मुंबई पोलीसाचे नागरिकांना आवाहन
-पनीर व दुग्धजन्य पदार्थ फक्त विश्वसनीय दुकानातुन किंवा ब्रँडेड खरेदी करावेत व लेबल नीट तपासावे.
– सुटे किंवा लेबल नसलेले पदार्थ खरेदी करणे टाळावेत.
– मलाईयुक्त पनीरमध्ये दुधाचा नैसर्गिक वास व दाणेदार पोत असतो. बनावट पनीर रबरासारखे किंवा मेणासारखे जाणवते.
– भेसळयुक्त पनीर खाल्ल्याने अन्न विषबाधा व आरोग्यास गंभीर धोके संभवतात.
– संशयास्पद विक्री/साठा आढळल्यास त्वरित पोलीस नियत्रंण कक्षाच्या १०० क्रमांकावर कळवावे. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवली जाईल.
व्यापाऱ्यांसाठी संदेश
– भेसळयुक्त अन्नपदार्थाचे उत्पादन/विक्री करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
– प्रामाणिक व्यापाऱ्यांनी अशा पदार्थांची साठवणूक टाळून प्रशासनास सहकार्य करावे.