रेल्वेमंत्र्यांनी मंगळवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात खास मुंबईच्या वाटय़ाला जुन्याच घोषणांव्यतिरिक्त काहीच पदरी पडले नाही. ७२ नव्या उपनगरी गाडय़ा व काही प्रवासी सुविधा याखेरीज यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पातून काहीच मिळाले नाही. याउलट भविष्यात भाडेवाढ होण्याची शक्यता रेल्वेमंत्र्यांनी व्यक्त केल्याने मुंबईकरांचे धाबे दणाणले आहे.
रेल्वेमंत्र्यांनी संपूर्ण अर्थसंकल्पात फक्त एकदाच मुंबईच्या उपनगरी सेवेचा उल्लेख केला तोही जुनीच घोषणा नव्याने जाहीर करताना! उपनगरी सेवेत येत्या दोन वर्षांत ८६४ नवीन डबे रुजू होतील, अशी घोषणा गौडा यांनी केली. मात्र, ही घोषणा दोन वर्षांपूर्वीच झाली होती. त्यानुसार सध्या बंबार्डिअर कंपनीच्या दोन गाडय़ा सध्या कल्याण येथे परीक्षणासाठी आल्या आहेत. त्यामुळे उर्वरित ८४० डबे कधी येणार, याची प्रतीक्षा आहे. रेल्वेमंत्र्यांनी केलेल्या इतर घोषणांचा लाभ मुंबईतील काही स्थानकांना होऊ शकतो, एवढाच काय तो दिलासा.
संभाव्य सुधारणा..
* उपनगरी गाडय़ांसाठी स्वयंचलित दरवाजे बसवणार. मुंबईतील किमान दोन स्थानकांचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा विकास.
* सरकारी-खासगी सहभागाने महत्त्वाच्या स्थानकांवर पादचारी पूल, सरकते जिने, उद्वाहक बसवणार. यात ठाणे, कुर्ला, अंधेरी, घाटकोपर, वांद्रे, बोरिवली, कल्याण, दादर, भायखळा, मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस, चर्चगेट, मुंबई सेंट्रल, डोंबिवली या स्थानकांचा समावेश.
* सर्व महत्त्वाच्या स्थानकांच्या फलाटांवरील छत, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा यांसाठी सेवाभावी संस्था, कॉर्पोरेट कार्यालये, खासगी कंपन्या यांच्यासह करार करणार. मुंबईतील काही स्थानकांची निवड.
* वांद्रे टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई सेंट्रल, मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे बॅटरीवर चालणाऱ्या गाडय़ा तैनात करणार. या गाडय़ांमुळे अपंग, वृद्ध, महिला यांना मदत होईल.