डय़ुटी समितीतील नेमणुकांवरून प्रशासनाशी मतभेद; दोन दिवसांत प्रतिसाद न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा
विविध तांत्रिक बिघाड, प्रवासी आंदोलने, रेल्वेबाह्य़ गटांची आंदोलने यांमुळे जेरीस आलेल्या मध्य रेल्वे प्रशासनाला आता अंतर्गत आंदोलनाला तोंड द्यावे लागणार आहे. उपनगरीय सेवेतील महत्त्वाचा घटक असलेले मोटरमन व गार्ड यांच्या कामाच्या डय़ुटय़ा लावणाऱ्या समितीमधील प्रतिनिधित्त्वावरून गार्ड आणि मोटरमन यांनी प्रशासनाचा निषेध केला आहे. प्रशासनाने दोन दिवसांत सकारात्मक प्रतिसाद न दिल्यास १ फेब्रुवारी रोजी जादा वेळ काम बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मोटरमन व गार्ड यांच्या विविध संघटनांनी दिला आहे. त्यामुळे नव्या महिन्याच्या पहिल्याच दिवशी उपनगरीय गाडय़ांचे वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे.
मध्य रेल्वेवर गार्ड आणि मोटरमन यांच्या डय़ुटी लावण्यासाठी एक समिती असते. या समितीत मोटरमन व गार्ड यांच्यापैकी प्रत्येकी दोन म्हणजेच चार सदस्यांचा समावेश असतो. त्यासाठी गार्ड आणि मोटरमन यांच्यात अंतर्गत निवडणुका होतात आणि या दोन-दोन सदस्यांची निवड केली जाते. रेल्वे कामगार सेना, एससी-एसटी रेल्वे कर्मचारी संघटना आदी संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वे प्रशासनाने या अंतर्गत निवडणुका रद्द ठरवल्या आहेत. प्रशासनाचा निर्णय कर्मचारी संघटनांमधील लोकशाहीसाठी घातक असल्याची टीका रेल्वे कामगार सेनेच्या एका पदाधिकाऱ्याने गोपनीयतेच्या अटीवर केली.
निवडणुका रद्द करण्याच्या रेल्वेच्या निर्णयाचा निषेध म्हणून सोमवारी गार्ड व मोटरमन यांनी काळ्या फिती लावून काम केले. यातूनही प्रशासनाने धडा घेत दोन दिवसांमध्ये सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर गार्ड व मोटरमन कामाच्या ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ काम न करण्याचा निर्णय घेतील, असेही या पदाधिकाऱ्याने सांगितले. सध्या गार्ड व मोटरमन जादा वेळ काम करत असल्यानेच उपनगरीय रेल्वेचा गाडा सुरळीत चालू आहे. या दोन घटकांनी जादा वेळ काम न केल्यास उपनगरीय रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.