मुंबई उपनगरीय मार्गावर ५० टक्के वातानुकूलित लोकल चालविण्याच्या सूचना

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर एक वातानुकूलित लोकल सेवेत येण्यासाठी बराच कालावधी लागलेला असतानाच सध्या धावत असलेल्या लोकलपैकी ५० टक्के लोकल बदलून त्याऐवजी वातानुकूलित लोकल चालवा, अशी सूचना रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी एमआरव्हीसी (मुंबई रेल्वे विकास महामंडळ), पश्चिम आणि मध्य रेल्वेला केली आहे.

या सूचनेनंतर एमआरव्हीसीकडून त्याचा अभ्यास करून प्रस्ताव तयार केला जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हा प्रकल्प लवकरच मार्गी लावण्याची सूचनाही करण्यात आली आहे. शनिवारी सह्य़ाद्री येथे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी एमआरव्हीसी, पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे अधिकाऱ्यांसोबत विविध प्रकल्पांवर चर्चा केली. त्यावेळी ही सूचना करण्यात आली. मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर साधारण दीड वर्षांपूर्वी एक वातानुकूलित लोकल दाखल झाली. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर लोकल दाखल झाल्यावर त्याच्या चाचण्या घेण्यात आल्या. मात्र, कुर्ला ते सीएसएमटी दरम्यान पुलांची कमी असलेली उंची आणि वातानुकूलित लोकलची जादा उंची यामुळे तांत्रिक मुद्दा उपस्थित झाल्याने लोकल चालविण्यास मध्य रेल्वेने नकार दिला. त्यानंतर पश्चिम रेल्वेने वातानुकूलित लोकल चालविण्याची तयारी दर्शविली आणि यशस्वीरीत्या चाचण्या केल्यावर २५ डिसेंबरपासून लोकल चालविण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट करण्यात आले. एक लोकल दाखल होण्यासाठी झालेल्या विलंबानंतर एमआरव्हीसीकडून ४७ वातानुकूलित लोकलही २०२० पासून टप्प्याटप्प्यात आणण्यात येणार आहेत. पनवेल ते कर्जत दुहेरी मार्ग, विरार ते डहाणू चौपदरीकरण याचबरोबर हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर या लोकल चालविण्याचे नियोजन आहे.

यानंतर आता रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी आणखी वातानुकूलित लोकलचे ‘स्वप्न’च बाळगले आहे. गोयल यांची एमआरव्हीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय, पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार गुप्ता, मध्य रेल्वे महाव्यवस्थापक डी.के.शर्मा यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत अनेक मुद्दय़ांवर चर्चा करण्यात आली.

दाखल होणाऱ्या वातानुकूलित लोकलचा आढावा घेतानाच त्यांनी येणाऱ्या अडथळ्यांची माहितीही घेतली. वातानुकूलित लोकलची संख्या वाढवण्यावर त्यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर एकूण धावत असलेल्या लोकलपैकी ५० टक्के लोकल बदलून त्याऐवजी वातानुकूलित लोकल चालविता येतील का, याची पडताळणी करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली. रेल्वेमंत्र्यांच्या सूचनेनंतर एमआरव्हीसीसह पश्चिम आणि मध्य रेल्वेकडून आढावा घेतला जाणार आहे.

नवीन बम्बार्डियरचे काय?

सध्या पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १०० लोकल आणि मध्य रेल्वेच्या ताफ्यात १४२ लोकल गाडय़ा आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे पश्चिम रेल्वेवर १०० लोकल गाडय़ांपैकी ७२ गाडय़ा नवीन बम्बार्डियर आहेत. तर मध्य रेल्वेवर २० नवीन बम्बार्डियर लोकलही लवकरच दाखल होणार आहेत. त्यामुळे एकंदरीतच लोकलची जुळवाजुळव करताना एमआरव्हीसी, मध्य आणि पश्चिम रेल्वेची दमछाक उडणार आहे.

रेल्वेमंत्र्यांनी वातानुकूलित लोकलचे नियोजन करण्यास सांगितले आहे. त्यादृष्टीने आम्ही काम करण्यास सुरुवात करू. सध्या किती लोकल आहेत, नवीन लोकल किती येणार आहेत याचा अभ्यास करणार आहोत. सर्व आढावा घेतल्यानंतर अंतिम निर्णय घेऊ.

– प्रभात सहाय, एमआरव्हीसी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक