मुंबई : लसीकरण (दोन्ही मात्रा) होऊन १४ दिवस झालेल्या प्रवाशांना उपनगरीय रेल्वे प्रवासासाठी दैनंदिन तिकिटे देण्यास राज्य सरकारने रविवारी मंजुरी दिली. त्यामुळे रेल्वेनेही रविवारपासूनच दैनंदिन तिकीटविक्रीस सुरुवात केली. या निर्णयामुळे लाखो प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. रुग्णसंख्येत अशीच घट होत राहिल्यास दिवाळीनंतर अन्य निर्बंधही शिथिल करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.
दोन्ही लसमात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र रेल्वे स्थानकातील पालिका कर्मचाऱ्यांकडून प्रमाणित केल्यानंतर ते तिकीट खिडक्यांवर दाखवावे लागेल. ते दाखवल्यावर प्रवाशांना तिकीट मिळेल किंवा ‘युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास’ दाखवूनही तिकीट घेता येईल, असे रेल्वेने स्पष्ट केले. दैनंदिन तिकिटे दिली जात नसल्याने विनातिकीट प्रवाशांची संख्याही वाढली होती. करोनाच्या रुग्णसंख्येत घट झाल्यानेच राज्य सरकारने जास्तीत जास्त निर्बंध शिथिल करण्यावर भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी उपनगरीय रेल्वे प्रवासासाठी दैनंदिन तिकिटे वितरित करण्यास परवानगी दिली. त्यानंतर लगेचच रेल्वेने खिडक्यांवर तिकीटविक्री सुरू केली. राज्य सरकारच्या निर्णयाने लाखो मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. त्यातही दिवाळीपूर्वी हा निर्णय झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
राज्य सरकारने ऑगस्टपासून रेल्वे प्रवासाला परवानगी दिली असली तरी लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्यांना मासिक पास काढूनच प्रवास करावा लागत होता. यामुळे मुंबईकरांमध्ये अस्वस्थता होती. एखादा दिवस प्रवास करायचा झाल्यास तिकीट दिले जात नव्हते. परिणामी मासिक पास काढावा लागे किंवा रस्तेमार्गे प्रवासाची कसरत करावी लागे. राज्य सरकारने मान्यता दिल्यावरच दैनंदिन तिकिटे दिली जातील, असे रेल्वेने स्पष्ट केले होते.
‘युनिव्हर्सल पास’ सक्तीचा
लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांना दैनंदिन तिकिटे देण्यास परवानगी दिल्याचे राज्याचे मदत आणि पुनर्वसन सचिव असिम गुप्ता यांनी रेल्वेला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार मासिक पासाप्रमाणेच खिडकीवर तिकीट खरेदीसाठी ‘युनिव्हर्सल पास’ दाखवणे बंधनकारक असेल. ‘युनिव्हर्सल पास’ असेल तरच तिकीट मिळेल.
दिवाळीनंतर राज्य निर्बंधमुक्त?
अजूनही तरणतलाव बंद आहेत. याशिवाय मोकळ्या मैदानांमध्ये राजकीय सभा घेता येत नाहीत (फक्त निवडणूक असलेल्या ठिकाणी सभांना परवानगी दिली जाते). चित्रपट आणि नाटय़गृहे ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यात आली आहेत. मात्र, रुग्णसंख्या आणखी कमी झाल्यास १५ नोव्हेंबरनंतर निर्बंध आणखी शिथिल करण्याची सरकारची योजना आहे. नाटय़ आणि चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने सुरू करता येतील. पण दिवाळीनंतर आठवडाभर रुग्णसंख्येचा आढावा घेऊनच निर्बंध किती शिथिल करायचे याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. रुग्णसंख्या
वाढल्यास निर्बंध अधिक कठोर करण्याशिवाय पर्याय नसेल, असे सांगण्यात आले. मुंबई, ठाणे, पुणे, अहमदनगर या जिल्ह्य़ांचा अपवाद वगळता राज्यातील उर्वरित भागांत करोनाबाधितांची संख्या कमी आहे.
दोन्ही लसमात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र रेल्वे स्थानकातील पालिका कर्मचाऱ्यांकडून प्रमाणित केल्यानंतर ते तिकीट खिडक्यांवर दाखवावे लागेल. त्यानंतर प्रवाशांना तिकीट मिळेल किंवा ‘युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास’ दाखवूनही तिकीट घेता येईल.
– सुमित ठाकूर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, प. रेल्वे