मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पावसाचा मुक्काम कायम असून सातही तलावांमधील जलसाठा १४.८० टक्क्यांवर पोहोचला आहे. तलावांमधील जलसाठा खालावल्यामुळे मुंबईत १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. तलावांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे जलसाठ्यात वाढ होईल, असा विश्वास मुंबई महानगरपालिकेतील जल अभियंता विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

मुंबईकरांना अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी तलावांमधून दररोज ३८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. जूनमध्ये पावसाने दडी मारल्यामुळे सातही तलावांमधील जलसाठा खालावला होता. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेला मुंबईत १० टक्के पाणी कपात लागू करावी लागली. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे तलावांमधील जलसाठ्या हळूहळू वाढ होऊ लागली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार मंगळवारी सकाळी ६ वाजता तलावांमधील जलसाठा १४.८० टक्क्यांवर पोहोचला असून तलावात दोन लाख १४ हजार १६९ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध होता. तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा मुक्काम कायम असून जलसाठ्यात आणखी भर पडेल, असा विश्वास जल अभियंता विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

गेल्या १४ तासांमध्ये अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी तलाव परिसरात अनुक्रमे १४ मि.मी., ५६ मि.मी., ७८ मि.मी., ३१ मि.मी., ६१ मि.मी., ११९ मि.मी. व २२७ मि.मी. पावसाची नोंद झाली.

५ जुलै रोजीचा तलावांमधील जलसाठा

वर्ष  – जलसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)

२०२२ – २,१४,१६९

२०२१ – २,७४,४९२

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०२० – १,१५,५०७