scorecardresearch

पुनर्रचनेवर हरकतींचा पाऊस

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रभाग पुनर्रचना आराखडय़ावर शेवटच्या दिवसापर्यंत तब्बल ८०० हून अधिक हरकती व सूचना सादर करण्यात आल्या आहेत.

शेवटच्या दिवशीच चारशेहून अधिक आक्षेप अर्ज; २२ फेब्रुवारीपासून सुनावणी

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रभाग पुनर्रचना आराखडय़ावर शेवटच्या दिवसापर्यंत तब्बल ८०० हून अधिक हरकती व सूचना सादर करण्यात आल्या आहेत. हरकती आणि सूचना सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल ४०० तक्रारी आल्या आहेत. शेवटच्या दिवशी सर्वाधिक हरकती आणि सूचना लोकप्रतिनिधींकडून सादर करण्यात आल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेतील प्रभागांची संख्या नऊने वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यामुळे नगरसेवकांची संख्या २२७ वरून २३६ वर गेली आहे.  निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पालिकेने प्रभागवाढीचा आराखडा हरकती व सूचनांसाठी प्रसिद्ध केला होता. हरकती व सूचनांसाठी गेल्या १४ दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. गेल्या चौदा दिवसांत ८०० हून अधिक हरकती व सूचना आल्या आहेत. रविवापर्यंत तब्बल ३४५ तक्रारी आल्या होत्या तर शेवटच्या एका दिवसात साडेचारशे तक्रारी आल्या आहेत. शेवटच्या दिवशी आलेल्या तक्रारींमध्ये लोकप्रतिनिधींच्या सर्वाधिक तक्रारींचा समावेश असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. वसाहती किंवा सर्वसामान्य नागरिक, समाज यांच्याकडून आलेल्या तक्रारींचे प्रमाण अत्यल्प असल्याचेही त्यांनी सांगितले, तर काही प्रभागांमध्ये बदल केलेले नसताना तेथेही तक्रारी करण्यात आल्याचे समजते.

 २२ फेब्रुवारीपासून या हरकती व सूचनांवर सुनावणी होणार असून त्याकरीता समिती नेमण्यात आली आहे. त्यात शहर व उपनगरचे जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त यांचा समावेश आहे.  लवकरच सुनावणीचे ठिकाण ठरवण्यात येणार असून २२ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत ही सुनावणी होणार आहे.  आलेल्या तक्रारींमध्ये लोकसंख्येचा असमतोल, भौगोलिक सलगता किंवा काही अन्य काही चुका, तसेच एखादा भाग दुसऱ्या प्रभागात गेल्याबद्दलचा आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. यामध्ये जास्तीत जास्त आक्षेप हे राजकीय पक्षांकडून आलेले आहेत. पुढील चार, पाच दिवसांत तक्रारींची छाननी करून त्यात विषयानुरूप किंवा प्रशासकीय विभागानुसार एक एक दिवस सुनावणी घेतली जाण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या वेळी सुमारे साडेसहाशे हरकती व सूचना आल्या होत्या. मात्र यावेळी अद्याप आरक्षण जाहीर झालेले नसताना तक्रारींचा पाऊस पडला आहे. यावेळच्या सुनावणीत आरक्षणावरील तक्रारी नाहीत. त्यामुळे तक्रारी खूप असल्या तरी समान स्वरूपाच्या तक्रारी एकत्र करून त्यावर सुनावणी घेतली जाईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

अंधेरी परिसरातून ८५ तक्रारी

प्रभाग पुनर्रचनेवर हरकती आणि सूचना मागविण्याच्या शेवटच्या दिवशी ३ वाजेपर्यंत तब्बल ४५४ तक्रारी दाखल झाल्या आहेत. तर १४ दिवसांत एकूण आलेल्या तक्रारींची संख्या ८१२ होती.  पश्चिम उपनगरातून ३३९, पूर्व उपनगरातून २६३ तर शहर भागातून ७६ तक्रारी सादर करण्यात आल्या. विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरीच्या पूर्व भागाचा समावेश असलेल्या के पूर्व प्रभागातून सर्वाधिक ८५ तक्रारी आल्या आहेत. त्या खालोखाल देवनार, गोवंडी येथून ८४ तक्रारी आल्या आहेत. तर आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे उच्चभ्रू वस्ती असलेल्या कुलाबा, चर्चगेट परिसराचा समावेश असलेल्या ए विभागातून एकही तक्रार नोंदवण्यात आलेली नाही.

सर्वाधिक तक्रारी असलेले विभाग

  • विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी के पूर्व ८५
  • देवनार, गोवंडी एम पूर्व  ८४
  • घाटकोपर एन विभाग ७९
  • कांदिवली आर दक्षिण ७६

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rain objections restructuring objection form ysh

ताज्या बातम्या