‘मोदी म्हणतात, मुंबई ही गुजराथी बांधवांचे माहेरघर आहे, मग मराठी माणसाचे काय सासर आहे?’ असा खोचक सवाल करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला. येत्या ९ तारखेला होणाऱ्या सभेनंतर टोलच्या मुद्दय़ावरून महाराष्ट्रात ‘धुमाकूळ’ घालण्याचा इशाराही त्यांनी दिला.
लालबाग येथे रविवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या महामेळाव्यात राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागली. ‘मोदी म्हणतात मुंबई ही गुजराथी माणसाचे माहेरघर आहे. मग मुंबई मराठी माणसाचे सासर आहे का? मग गुजरात काय आहे?’ असा सवाल राज ठाकरे यांनी केला. गेल्या महिन्यात झालेल्या भाजपच्या ‘सिंहगर्जना’ मेळाव्यातील मोदींच्या भाषणाचा संदर्भ घेत ‘महाराष्ट्रात, मुंबईत येऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घ्यायला विसरता. इतक्या वर्षांची युती विसरता,’ असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला. संयुक्त महाराष्ट्राच्या जखमांवरील खपल्या काढू नका, असा इशाराही त्यांनी दिला.
लालबाग-परळ भागात मोठय़ा प्रमाणावर जैन समाजाचे टॉवर उभे राहिले आहेत. अलीकडेच त्यांना अल्पसंख्याकांचा दर्जा देण्यात आला आहे. पण या भागात राहणाऱ्या मराठी माणसाला अल्पसंख्याकांचा दर्जा देण्याची गरज आहे, असे राज म्हणाले. ‘टोलमधून पैसे खायला वेळ आहे. येत्या ९ तारखेला पुण्यामध्ये जाहीर सभेत मी काय करणार ते उघड करीन. त्यानंतर महाराष्ट्रात काय धुमाकूळ घालतो ते पाहाच,’ असा इशारा राज यांनी दिला.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Feb 2014 रोजी प्रकाशित
मुंबई मराठी माणसाचे सासर आहे का?
‘मोदी म्हणतात, मुंबई ही गुजराथी बांधवांचे माहेरघर आहे, मग मराठी माणसाचे काय सासर आहे?’ असा खोचक सवाल करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे
First published on: 03-02-2014 at 12:32 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj criticises narendra modi for remark on mumbai