नरेपार्क मैदानातील क्रीडा संकुलावरून शिवसेनेशी सुरू असलेला वाद, ज्येष्ठ सेनानेते मनोहर जोशींनी शिवसेना नेतृत्वावर डागलेली तोफ, मनसेशी वाढलेली जवळीक या सर्व पाश्र्वभूमीवर दसऱ्याच्या मुहूर्तावर आयोजित मनसेच्या मेळाव्यात अध्यक्ष राज ठाकरे काहीतरी घणाघाती बोलतील, या आशेने आलेल्या गर्दीला रविवारी नरेपार्कवरून हिरमुसले होऊनच परतावे लागले. भाषणात सुरुवातीलाच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकडे बोट दाखवून ‘तुम्हाला हवे ते मी बोलणार नाही’, असा टोला त्यांनी हाणला.
मनसेचे आमदार बाळा नांदगावकर यांच्या मतदारसंघात येणाऱ्या नरे पार्क मैदानावरील प्रस्तावित क्रीडा संकुलावरून गेल्या काही दिवसांपासून शिवसेना व मनसे यांच्यात वाद सुरू आहे. तोंडावर आलेल्या लोकसभा व विधानसभा लक्षात घेऊन नांदगावकर यांना परळवासीयांसमोर आपली बाजू मांडायची होती. त्यासाठी त्यांनी दसऱ्याचा मुहूर्त शोधून राज यांची थेट नरेपार्क मैदानातच सभा घडवून आणली.
दुपारी दीडच्या दरम्यान राज सभास्थळी आले. त्यांच्या समवेत बाळा नांदगावकर, आ. नितीन सरदेसाई, आदित्य शिरोडकर व इतर पदाधिकाऱ्यांचा फौजफाटा होता. सर्वप्रथम बाळा नांदगावकर यांनी भाषण केले. बाळासाहेब व मीनाताई ठाकरे यांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या क्रीडा संकुलाला शिवेसनेकडून विरोध होत असल्याची टीका त्यांनी केली. ‘महाराष्ट्राकडे वाकडय़ा नजरेने पाहणाऱ्यांना ठोकण्यासाठी मी पक्ष स्थापन केला आहे, मराठी माणसांची टाळकी फोडण्यासाठी नाही’, असे सांगून त्यांनी शिवसेनेबद्दल एकही शब्द उच्चारला नाही. स्थानिकांना हवे, तर विकास कामे करा, नसेल तर करू नका, असा सल्ला त्यांनी नांदगावकरांना दिला. ‘कुणाला काय वाटते म्हणून मी बोलत नाही, तर मला जे वाटते ते बोलत असतो’, अशा शब्दात त्यांनी पुन्हा माध्यमांची हजेरी घेतली आणि दसऱ्याच्या शुभेच्छा देत अवघ्या दोन मिनिटांत भाषण आटोपल़े
संग्रहित लेख, दिनांक 14th Oct 2013 रोजी प्रकाशित
नरेपार्कवरील ‘सामना’ रंगलाच नाही
नरेपार्क मैदानातील क्रीडा संकुलावरून शिवसेनेशी सुरू असलेला वाद, ज्येष्ठ सेनानेते मनोहर जोशींनी शिवसेना नेतृत्वावर डागलेली तोफ

First published on: 14-10-2013 at 01:01 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray address at nare park