मागील अनेक दिवसांपासून राज्यासह देशात शिवसेनेतील बंडखोरी आणि त्यानंतर महाराष्ट्रात झालेलं सत्तांतरनाट्य हा चर्चेचा विषय आहे. शिवसेनेतील बंडखोरीला कोण जबाबदार याबाबत अनेक आरोप झाले. बंडखोर आमदारांनी कधी हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केला, तर कधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अजित पवारांवर गंभीर आरोप केले. दुसरीकडे महाविकासआघाडीच्या नेत्यांनी शिवसेनेतील बंडखोरीमागे भाजपा असल्याचा आरोप केला. आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही आपली भूमिका मांडत देवेंद्र फडणवीस यांना उगाच फुकटचं श्रेय न घेण्याचा सल्ला दिल्याचं सांगितलंय. ते शनिवारी (२३ जुलै) झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले, “माझ्याकडे देवेंद्र फडणवीस आले होते. मी त्यांना म्हटलं उगाच फुकटचं श्रेय घेऊ नका. ते जोरजोरात हसायला लागले. जी गोष्ट घडली ती गोष्ट ना फडणवीसांनी घडवली, ना अमित शाहांनी घडवली, ना भाजपाने ना अजून कोणी घडवली.”

“याचं श्रेय तुम्हाला उद्धव ठाकरेंनाच द्यावं लागेल. कारण त्यांच्यामुळे हे एकदा घडलेलं नाही. आज आमदार बाहेर पडले तेव्हा आणि मी बाहेर पडलो तेव्हाही कारणं हीच होती. मध्यंतरी आणखी काही लोक सोडून गेले तेव्हीही कारणं हीच होती,” असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं.

“संजय राऊतांच्या वक्तव्यांनी शिवसेनेचे आमदार फुटले नाहीत”

संजय राऊतांवर बोलताना राज ठाकरे म्हणाले, “संजय राऊतांनी अनेक प्रतिक्रिया दिली. संजय राऊतांचा यात काय संबंध? ते रोज सकाळी टेलिव्हिजनवर येतात, अहंकारात रोज काही ना काही बोलतात. त्याने लोक वैतागले आहेत. ते तेवढ्यापुरतं होतं.”

“संजय राऊतांच्या वक्तव्यांनी आमदार फुटत नसतात,” असं म्हणत राज ठाकरेंनी संजय राऊतांवरही टोला लगावला.

“बाळासाहेब असते तर बंडखोरी झालीच नसती”

“बाळासाहेब ठाकरे असते तर शिवसेनेत बंडखोरी झालीच नसती. ते शक्यच नव्हतं. शिवसेना एक पक्ष म्हणून पाहू नका. बाळासाहेब होते तोपर्यंत शिवसेनेत बाळासाहेबांच्या विचाराने माणसं बांधली गेली होती. बाळासाहेब होते तोपर्यंत तो विचार होता आणि त्या विचाराने बांधलेली ती माणसं होती. त्यामुळे बाळासाहेब असते तर बंडखोरी झालीच नसती,” असंही राज ठाकरेंनी नमूद केलं.

हेही वाचा : राज ठाकरे-फडणवीस भेटीवर सुप्रिया सुळेंचा टोला; म्हणाल्या “एक आमदार असणाऱ्याकडे १०५ आमदार असणारा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी राज ठाकरेंनी शिवसेनेतून लोक सोडून जाण्याची कारणं बाळासाहेब ठाकरेंना सांगितली होती, असंही म्हटलं. ते म्हणाले, “आज आमदार बाहेर पडले तेव्हा आणि मी बाहेर पडलो तेव्हाही कारणं तिच होती. मध्यंतरी आणखी काही लोक सोडून गेली त्याचीही कारणं तिच आहेत. ही कारणं मी त्यावेळी देखील बाळासाहेब ठाकरेंना सांगत होतो.”

“मी जेव्हा बाळासाहेब ठाकरेंच्या आजूबाजूचे बडवे म्हटलं होतं तेव्हा हे सगळे त्यात होते. आता उद्धव ठाकरे यांच्या बाजूला वेगळे बडवे आहेत असं नाही. हेच ते सगळे बडवे आहेत,” असंही राज ठाकरेंनी नमूद केलं.