मनसे प्रमुख राज ठाकरे आणि एमआयएमचे नेते असदुद्दिन ओवेसी यांच्यात असलेला छत्तीसचा आकडा सर्वश्रुत आहेच. राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून काही कार्यकर्त्यांनी थेट ओवेसींचे चित्र असलेला केक कापण्यासाठी राज ठाकरे यांच्यापुढे केला. त्यानंतर कार्यकर्त्यांनीच हा केक कापून आनंद साजरा केला.
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी सकाळपासून ‘कृष्णकुंज’ या त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. राज ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची आणि पक्षाच्या नेत्यांची रिघ पाहायला मिळते आहे. राज ठाकरेही उपस्थितांना भेटून त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत आहेत. अशाच शुभेच्छांचा स्वीकार करीत असताना काही कार्यकर्त्यांनी एक केक त्यांच्यापुढे नेला. त्यावर ओवेसींचे चित्र रेखाटण्यात आले होते. राज ठाकरे यांच्यापुढे केक करण्यात आल्यानंतर कार्यकर्त्यांनीच तो केक कापल्याचे समजते.
काही महिन्यांपूर्वी राज्याचे माजी महाधिवक्त श्रीहरी अणे यांनी त्यांच्या वाढदिवसी महाराष्ट्राच्या नकाशाच्या आकाराचा केक कापत त्यातून विदर्भ वेगळा काढला होता. अणे यांना ही कृती महागात पडेल, असे प्रत्युत्तर त्यावेळी राज ठाकरे यांनी अणे यांना दिले होते. महाराष्ट्रातील अनेक नागरिकांनीही त्यांच्या या कृतीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर खुद्द अणे यांनी घडल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती.