वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय प्रवेशासाठी सर्वोच्च न्यायालयाने यंदापासून बंधनकारक केलेल्या ‘नीट’ परीक्षेसंदर्भात काही पालकांसह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. यावेळी पालकांच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले. या संदर्भात आपण कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही चर्चा केली असून, त्यांनाही या विषयामध्ये लक्ष घालण्याची विनंती केली असल्याचे राज ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितले. या परीक्षेवरून निर्माण झालेल्या गोंधळामुळे हा देश नक्की चालवतंय कोण सरकार की न्यायालये, असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना राज ठाकरे म्हणाले, नीट परीक्षेसंदर्भातील निर्णय सरकारने घ्यायचा आहे. परीक्षा घ्यायची की नाही, कधीपासून घ्यायची हे सरकारला ठरवू द्या. सर्वोच्च न्यायालयाला वाटले म्हणून यंदापासूनच नीट परीक्षा बंधनकारक करणे योग्य नाही. आपण कालच यासंदर्भात नरेंद्र मोदी यांच्याशीही चर्चा केली असून, त्यांना या विषयामध्ये लक्ष घालण्याची विनंती केली आहे. त्यांनीही आपण तातडीने या विषयामध्ये लक्ष घालू, असे आश्वासन दिल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. राज्यात सध्या ज्या प्रमाणे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्याप्रमाणे या विषयावरून उद्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या करायला नको, अशीही भीती राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस आजच पंतप्रधानांची वेळ घेणार असून, त्यांच्यासोबत या विषयावर चर्चा करणार आहेत. मोदींनी यामध्ये लक्ष घातले, तर हा विषय नक्की सुटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray meets chief minister devendra fadnavis on neet issue
First published on: 16-05-2016 at 11:27 IST