कोणत्याही परिस्थितीत ३० सप्टेंबपर्यंत गटाध्यक्षांची यादी सादर करा.. जे पदाधिकारी यादी सादर करणार नाहीत त्यांना पदावर ठेवायचे की नाही, याचा विचार करावा लागेल.. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यशवंत नाटय़गृहात विभागाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सज्जड दम दिला होता.. विषय होता निवडणुकांनिमित्त पक्षबांधणीचा.. प्रत्यक्षात, १ ऑक्टोबर रोजी मनसेच्या दादरच्या मुख्यालयात केवळ मुंबईतील एक-दोन विभागांतूनच काहीशे गटाध्यक्षांची यादी जमा झाली. आता राज काय करणार याकडे पक्षातील ज्येष्ठांचे लक्ष लागून राहिले आहे.
शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गेल्या महिन्यात सेनेच्या लोकसभेच्या बालेकिल्ल्यात गटनेत्यांचे मेळावे घेतले. मुंबईत गटनेत्यांचे शक्तिप्रदर्शन शिवसेनेची ताकद दाखवून देणारे होते. या पाश्र्वभूमीवर मनसेकडे मतदारसंघात बूथनिहाय गटाध्यक्ष असण्याची गरज लक्षात घेऊन यशवंत नाटय़गृहातील सभेत, ‘तुम्ही स्थानिक पातळीवर पक्षबांधणी करा, मते आणण्याची व तुम्हाला सत्तेपर्यंत नेण्याची जबाबदारी माझी,’ असे राज यांनी सांगितले होते. गटाध्यक्षांची नियुक्ती एक महिन्यात करून त्यांच्या याद्या सरचिटणीस शिरीष सावंत, पाटील व फडके यांच्याकडे राजगड मुख्यालयावर जमा करा, अन्यथा कारवाईला तयार राहा, असा सज्जड दमही त्यांनी दिला. याद्या तयार करण्यासाठी मतदारांची यादी असलेल्या सीडी तसेच कशा स्वरुपात माहिती द्यायची याचा फॉर्मही त्यांनी दिला होता.  
संपूर्ण राज्याचा विचार करता एकूण ८० हजार बूथ असून तेवढे गटाध्यक्ष नेमणे अपेक्षित होते. मुंबईतील लोकसभेच्या सहा मतदारसंघांत सुमारे साडेसहा हजार गटाध्यक्ष, ठाण्यात बाराशे ते दीड हजार, पुणे येथे अडीच हजार आणि नाशिकमधील विधानसभेचे तीन मतदारसंघ लक्षात घेता एक हजार गटाध्यक्षांची यादी ३० सप्टेंबपर्यंत राजगडावर सादर होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात केवळ मुंबईतील एक- दोन विभाग अध्यक्षांनीच आपल्या विभागातून गटाध्यक्षांची यादी राजगडवर सादर केल्याचे मनसेच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.
एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रचारपूर्व पहिल्या फेरीत राज्यातील सेनेच्या दृष्टीने महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघांत गटप्रमुखांचे जोरदार मेळावे घेऊनही झाले, तर दुसरीकडे राज यांनी आदेश व वेळेचे बंधन घालूनही मनसेच्या पदाधिकाऱ्यांना गटाध्यक्षांच्या नेमणुकाही अद्यापि करता आलेल्या नाहीत.