नगरसेवक म्हणून तुम्ही काय ठसा उमटवला, केवळ लाद्यांवर लाद्या बसवणे म्हणजे काम नव्हे, दिसतील अशी कोणती कामे तुम्ही केलीत, मनसेचे नगरसेवक म्हणून तुमचे वेगळेपण काय?.. एकापाठोपाठ एक प्रश्नांची सरबत्ती राज ठाकरे यांच्याकडून करण्यात येत होती आणि उपस्थित नगरसेवकांकडे उत्तर मात्र नव्हते.
महापालिकानिहाय मनसेच्या नगरसेवकांच्या कामाचा आढावा घेण्याचे काम राज यांनी सुरू केले असून सोमवारी कल्याण-डोंबिवली महापालिकेतील नगरसेवकांची झाडाझडती झाली तर मंगळवारी नाशिकमधील नगरसेवकांना ‘मी लोकांना काय उत्तर द्यायचे’ असा खडा सवाल करून महापौर वाघ यांना कामगिरीत सुधारणा करण्यास सांगितले. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेत गेल्या तसेच २०१२ साली झालेल्या निवडणुकीत मोठय़ा प्रमाणात मनसेचे नगरसेवक निवडून आले. नाशिकमध्ये मनसेची सत्ता आहे तर कल्याण-डोंबिवलीत विरोधी पक्षनेतेपद मनसेकडे आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर जनमानसात नगरसेवकांची कामगिरी पोहोचली पाहिजे यासाठी मार्गदर्शन करतानाच, नगरसेवकांच्या कामगिरीचा आढावा राज यांनी घेण्यास सुरुवात केली आहे. मनसेला मोठय़ा विश्वासाने लोकांनी मतदान केले असून त्याचा विचार करून कामगिरीत सुधारणा करा अन्यथा मला तुमच्याबाबतीत वेगळा विचार करावा लागेल, असा इशाराही राज यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
येत्या शुक्रवारी मुंबई महापालिकेतील नगरसेवकांच्या कामगिरीचा आढाव घेण्यात येणार असून मुंबईतील नगरसेवक सावध होऊन त्यांनी आपापले अहवाल तयार करण्यास सुरुवात केली आहे. मनसेचे नगरसेवक वेगळे असले पाहिजे. त्यांची कामगिरी उत्तम असावी यासाठी उमेदवारी देण्यापूर्वी राज यांनी लेखी परीक्षाही घेतली होती. नागरी कामांची माहिती असलेले, सामाजिक कामाची तळमळ असणारे अभ्यासू नगरसेवक तयार व्हावे हा दृष्टीकोन यामागे होता. प्रत्यक्षात मनसेचे बहुतेक नगरसेवक राज यांच्या लेखी परीक्षेत चांगले उत्तीर्ण होऊनही महापालिकेच्या मैदानात नापास झाल्याचे दिसून येते. मात्र पक्षाकडून वरिष्ठाचे मार्गदर्शन नाही की ठोस कोणती कामे करावी याबाबत कोणती चर्चा नाही, असाच सूर कल्याण-डोबिवली व नाशिकमधील काही नगरसेवकांनी लावला. एका नगरसेवकाच्या म्हणण्यानुसार राज यांनी दरमहा आढावा घेऊन मार्गदर्शन केले असते तर आमच्या अडचणीही त्यांच्या लक्षात आल्या असत्या व आमची कामगिरीही सुधारली असती.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Jan 2014 रोजी प्रकाशित
राज ठाकरेंनी स्वपक्षीय नगरसेवकांना खडसावले
नगरसेवक म्हणून तुम्ही काय ठसा उमटवला, केवळ लाद्यांवर लाद्या बसवणे म्हणजे काम नव्हे, दिसतील अशी कोणती कामे तुम्ही केलीत,

First published on: 22-01-2014 at 04:24 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray takes on his corporators