Rajshree More मुंबईत राहिल शेख या तरुणाने अर्धनग्न आणि मद्यधुंद अवस्थेत कार चालवली आणि मराठी इन्फ्लुएन्सर राजश्री मोरेचा पाठलाग करुन तिच्या कारला धक्के दिले. त्यानंतर जेव्हा पोलिसांनी त्याला थांबवलं तेव्हा त्याने राजश्री मोरेला पाहताच शिवीगाळ सुरु केली. पोलिसांनाही शिव्या दिल्या. “माझा बाप मनसेचा उपाध्यक्ष आहे तो तुम्हाला विकत घेऊ शकतो” असं राहिल राजश्री मोरे आणि पोलिसांना धमकावत होता. तसंच त्याने राजश्री मोरे या इन्फ्लुएन्सरला मोठ्या प्रमाणावर शिवीगाळ केली आणि धमक्या दिल्या. ज्यानंतर राजश्री मोरेने थेट राज ठाकरेंना विनंती केली आहे. माझ्या विरोधात चाललेली ही मोहीम थांबवा, मी एक मराठी मुलगी आहे असं राजश्री मोरेने राज ठाकरेंना विनंती करत म्हटलं आहे. तसंच नेमका सगळा राडा काय घडला हे पण सांगितलं आहे.
राजश्री मोरेने नेमकं काय सांगितलं?
मी गोरेगावहून परतत होते तेव्हा एका इनोव्हा कारने माझ्या कारला धक्का मारला. मला आधी वाटलं की चुकून धक्का लागला. मात्र मुख्य रस्ता सोडून मला एका गल्लीतल्या एका रस्त्यात माझा पाठलाग करण्यात आला. मला जाणीवपूर्वक टार्गेट करण्यात आलं कारण तो रस्ता असा आहे की तिथे एका वेळी एकच कार जाऊ शकते. मी मराठी माणसं मेहनत करायला शिकवा म्हणाले होते. पण त्यावरुन मनसेने राडा घातला होता. माझ्याविरोधात तक्रारही केली. त्यानंतर मी व्हिडीओ मागे घेतला आणि माझे शब्दही मागे घेतले. मात्र तरीही मला टार्गेट करण्यात आलं. मी चालकाला विचारलं की आपली कार लॉक आहे ना? तो हो म्हणाला. तेवढ्यात मला दोन पोलीस हवालदार दिसले. त्यानंतरही माझ्या कारला धक्का मारण्यात आला. पण मुंबई पोलिसांनी मला साथ दिली.” असं राजश्री मोरेने एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
पोलिसांनाही राहिल शेख शिव्या देत होता
मुंबई पोलीस त्याला राहिल शेखला थांबवत होते पण तो थांबला नाही. तो पुढे जाऊन थांबला. त्यानंतर पोलीस खाली उतरले आणि त्याला सांगितलं आम्हाला कारची चावी दे. तो पोलिसांचं ऐकत नव्हता. तसंच मला पाहिल्यानंतर त्याने थेट शिवीगाळ करण्यात सुरुवात केली. राहिल शेख अर्धनग्न अवस्थेत होता खूप दारु प्यायला होता. त्याची अंतर्वस्त्रंही दिसत होती. त्याला हे लक्षात येत नव्हतं की त्याने कपडे घातले नाहीत. पण त्याला हे आठवत होतं की त्याचा बाप कोण आहे. मी मनसेचा आहे, माझा बाप मनसेचा उपाध्यक्ष आहे, तू राज ठाकरेंच्या घरी जा आणि पैसे घेऊन ये असं म्हणत मला त्याने धमक्या दिल्या, असंही राजश्रीने सांगितलं.

राहिल शेख पोलिसांशीही उर्मटपणे वागत होता-राजश्री मोरे
राजश्री पुढे म्हणाली, “सगळा धिंगाणा झाल्यानंतर आम्ही पोलीस ठाण्यात गेलो होतो. त्यावेळी तो उद्धटपणे वागत होता. पोलीस स्टेशनच्या टेबलवर त्याने पाय ठेवला होता. तो पोलिसांना शिव्या देत होता. माझा बाप कोण आहे तुम्हाला माहीत नाही तो तुम्हाला सगळ्यांना विकत घेऊ शकतो असंही त्याने पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी नंतर धरुन त्याला कोपऱ्यात बसवलं. आता बेल वाजली तरीही मला भीती वाटते. मी घराबाहेर पडण्याचीही भीती वाटते आहे. एका मराठी मुलीला जाणीवपूर्वक टार्गेट का केलं जातं आहे? मला असं कळलं की राहिल शेखला नोटीस देऊन सोडण्यात आलं. मी अजूनही सुरक्षेची मागणी केलेली नाही. माझे वकील येतील त्यानंतर पुढची कारवाई करायची आहे.”
राज ठाकरेंना माझी एकच विनंती आहे की…
राज ठाकरेंना एवढंच सांगायचं की आपण मुंबईत राहतो, मुंबईत गोर गरीब जे बाहेरुन आले आहेत ते आपलेच बहीण भाऊ आहेत. त्यामुळेच मी हा मुद्दा उचलला होता. मराठी लोक परप्रांतीय लोकांना सतवत आहेत, त्यांना मारहाण करत आहेत. मी आवाज उठवला म्हणून मला मनसेकडून टार्गेट केलं जातं आहे. घराबाहेर पडायचीही भीती मला वाटते. सर्वात मोठी गोष्ट मी भाजपा, काँग्रेस, शिवसेना, मनसे कुठल्याच पक्षाची नाही. मला राजकीय पक्षांशी घेणंदेणं नाही. माझ्याकडे ४० लोक काम करतात. त्यातले ३५ लोक मराठी आहेत बाकीचे परप्रांतीय आहेत. आपली मुंबई ही आपली आई आहे ती सगळ्यांना पोटात घेते. कुणालाही उपाशी झोपवत नाही. मराठी माणसांसाठी जर इतकं प्रेम आहे तर मग मराठी बायका आहेत ज्यांचे नवरे काम करत नाहीत, बेकार आहेत अशा महिलांचा छळ करत आहेत. तुम्ही त्यांची मदत का करत नाहीत? मराठी महिलांना तुम्ही मदत का करत नाहीत. मी देखील लोकांना मदत करत असते. पण मराठी भाषाच बोला असं नाही. दुबई किंवा इतर देशांमध्ये बघा तिथेही एकच राजा आहे. आपल्याकडे राजेच राजे आहेत. मी तुम्हाला विनंती करते की मराठी मुलीला त्रास होतो आहे तो तुम्ही आधी थांबवा. माझ्या जिवाला काहीही झालं तर तुमच्याच पक्षावर सगळं येणार, मला, माझ्या कुटुंबावर हल्ला झाला तर जबाबदारी मनसेची असेल. मी राजश्री मोरे ही मराठी मुलगी तुम्हाला हे सांगते आहे. माझ्या पाठीवर मारा पण पोटावर मारु नका. मी तुम्हाला विनंती करते आहे असं राजश्री मोरेने म्हटलं आहे.