अजमल कसाब हा हिंदू होता आणि २६/११ चा दहशतवादी हल्ला हा हिंदू दहशतवाद होता असं लष्कर ए तोयबाला सिद्ध करायचं होतं. राकेश मारिया यांच्या पुस्तकात हा उल्लेख करण्यात आला आहे. ज्यावरुन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी काँग्रेसवर आरोप केले आहेत. ‘कसाबच्या हाती हिंदू धर्मातील धागा बांधण्यात आला होता. त्याची ओळख बदलण्यात आली होती. समीर दिनेश चौधरी असं नाव त्याला देण्यात आलं होतं. लष्कर-ए-तोयबाला २६/११ चा दहशतवादी हल्ला हा हिंदू दहशतवाद्यांनी केला आहे असं सिद्ध करायचं होतं. कसाबला जागीच मारलं असतं तर असंच घडलं असतं. असं राकेश मारिया यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटलं आहे. यावरुनच काँग्रेसविरोधात केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे चांगलेच आक्रमक झाले आहेत.
#WATCH Union Minister Piyush Goyal speaks on reported excerpt from the Ex-Mumbai Police Commissioner Rakesh Maria’s book that Kasab would have died as Samir Dinesh Chaudhari with ‘red thread around his wrist’ had LeT succeeded in their plan pic.twitter.com/cxNTIVVF5K
— ANI (@ANI) February 18, 2020
काय म्हटलं आहे गोयल यांनी ?
राकेश मारिया हे सगळं आत्ता का सांगत आहेत? जेव्हा ते पोलीस आयुक्त होते तेव्हाच त्यांनी हे सत्य जगासमोर आणायला हवं होतं. पोलीस सेवेत असताना एखादी माहिती जर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे असेल तर ती त्यांनी सार्वजनिक करायला हवी होती. २६/११ च्या हल्ल्यावेळी एक मोठा कट काँग्रेसने रचला होता. काँग्रेसने रचलेले कुभांड या पुस्तकामुळे समोर आलं आहे. पी. चिदंबरम यांच्या सांगण्यावरुन हिंदू दहशतवाद्यांची एक बोगीच निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता. असंही गोयल यांनी म्हटलं आहे.
२६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा कट अत्यंत बारकाईने करण्यात आला होता. कुख्यात दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा या हल्ल्याला हिंदू दहशतवादाचे स्वरुप द्यायचं ठरलं होतं. धक्कादायक बाब ही की अजमल कसाबच्या मनगटाला हिंदू बांधतात तसंच पवित्र बंधन बांधण्यात आलं होतं. त्याची ओळखही बदलण्यात आली होती. समीर दिनेश चौधरी या नावाचं ओळखपत्रही त्याच्याजवळ होतं. त्या ओळखपत्रावर बंगळुरुचा पत्ताही टाकण्यात आला होता. जर कसाबला घटनास्थळीच मारलं गेलं असतं तर संपूर्ण जगाने 26/11 चा हल्ला हिंदू दहशतवाद म्हणून ओळखला गेला असता असं राकेश मारिया यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटलं आहे.
एवढंच नाही तर राकेश मारियांनी त्यांच्या पुस्तकात केलेल्या उल्लेखाप्रमाणे 26/11 च्या हल्ल्याचे कनेक्शन दाऊदसोबतही होते. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि जैश ए मोहम्मद यांना कसाबला संपवायचं होतं. त्यामुळे दाऊदला कसाबची सुपारी देण्यात आली होती.