भारतातील अनेक लोककलांच्या सादरीकरणाला सण-उत्सव व्यासपीठ मिळवून देत असतात. त्यामुळे त्यांच्या प्रचारात गणेशोत्सव, नवरात्रोत्सव हे सण महत्त्वाची भूमिका बजावतात. आताही नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने उत्तर प्रदेशातील रामलीला आणि कोकणातील दशावतार या लोककला सादर करण्याकरिता कलाकार मुंबईची वाट धरत आहेत.

नवरात्रीत या लोककलांच्या सादरीकरणाला मागणी असते. उत्तर प्रदेशातील लोकानाटय़ाचा ‘रामलीला’ हा प्रकार फार प्रसिद्ध आहे. रामाचे संपूर्ण चरित्र या नाटय़ातून सादर केले जाते. त्यासाठी आपल्या ठरलेल्या पात्राप्रमाणे विशेष अशी भडक रंगभूषा आणि वेशभूषा कलाकार धारण करतात. यातील रामाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराला इतके महत्त्व असते की त्याची सर्वप्रथम पूजा करून मिरवणूक काढली जाते. त्यावेळी जमलेले लोक त्याच्या पाय पडतात आणि नंतरच तो रामाचे पात्र सादर करण्यासाठी रंगमंचावर जातो.

मुंबईत उत्तर भारतीय बहुल समाजाची संख्या लक्षात घेता रामलीला सादर करणाऱ्या मंडळीना या काळात मागणी असते. उतर प्रदेशातून गेल्या दोन दिवसात अनेक रामलीला मंडळे मुंबईत सादरीकरणासाठी दाखल होत आहेत.

त्याचप्रमाणे कोकणाच्या मातीत रुजलेला ‘दशावतार’ हा नाटय़ प्रकारही नवरात्रीच्या आणि दसऱ्याच्या निमित्ताने सादर केला जातो. जत्रा-उस्तवात सादर होणारा हा प्रकार विशेष करून दसऱ्याच्या दिवशी सादर करण्याची परंपरा आहे. १७८७ मध्ये शामजी काळे या किर्तनकारांनी हा प्रकार कर्नाटकातून कोकणात आणला. भारतीय शास्त्रीय नृत्यातील कथकली या नृत्य प्रकाराचा प्रभाव दशावतारावर झालेला दिसतो. मुंबईत दशावतार सादर करणारी पाच-सात मंडळे असून कोकणातून स्थायिक झालेले चाकरमानी कोकणवासी ही मंडळे चालवतात.

पूर्वीच्या काळी गिरणी कामगारांच्या वेळेस मुंबईत दशावताराला प्रचंड मागणी होती. पण आता बदलत्या काळाप्रमाणे मागणी जरी कमी झाली असली तरी नवरात्रीच्या दिवसात काही मंडळे आम्हाला सादरणीकरणासाठी आवर्जून बोलवतात, अशी माहिती देवगड वरून आलेल्या ‘श्रीदेवी भगवती दशावतार नाटय़ मंडळा’चे प्रकाश लब्धे यांनी दिली.

१० ते २५ हजारांपर्यंत मानधन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रामलीलात साधारण २० ते २५ कलाकारांचा संच एका मंडळात असतो. ‘आम्ही गेली तीन वष्रे वाराणसीहून मुंबईत रामलीला सादर करण्यासाठी येत आहोत,’ असे ‘श्री हनुमान आदर्श रामलीला समिती’च्या विपुल गुप्ता यांनी सांगितले. रामलीलाचा प्रयोग सादर करण्यासाठी एका कार्यक्रमाचे वीस ते पंचवीस हजार रुपये मानधन घेतात. दशावतारात १८ कलाकारांचा संच असून रंगभूषा आणि वेशभूषा करण्यासाठी दीड तासाचा कालावधी या कलाकारांना लागतो. हार्मोनियम, पखवाज, झांज आणि चकवा या वाद्याच्या साहाय्याने दशावताराचे सादरीकरण केले जाते. साधारण दहा ते बारा हजार रुपयांचे मानधन ही मंडळे घेतात.