केंद्रातील सत्ताधारी ‘भारतीय जनता पक्षा’च्या (भाजप) हिंदुत्त्ववादी विचारसरणीला प्रकाशन, परिसंवाद, चर्चासत्रे, व्याख्याने, प्रशिक्षणे आदींच्या माध्यमातून वैचारिक इंधन पुरविण्याचे काम करणाऱ्या ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’ला मुंबई विद्यापीठाने ‘राज्यशास्त्र’ या विषयाकरिता संशोधन केंद्राचा दर्जा दिला आहे.
विद्यापीठात रुजू होण्यापूर्वी विद्यमान कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी प्रबोधिनीच्या संशोधन विभागाच्या संचालक पदाची जबाबदारी वाहिली होती. कुलगुरूपदी रुजू झाल्यानंतर वर्षभरातच प्रबोधिनीला संशोधन केंद्राचा दर्जा देऊन त्यांनी याची परतफेड केल्याची चर्चा सध्या विद्यापीठाच्या वर्तुळात रंगली आहे.
भाईंदरमधील उत्तन येथे १५ एकर जागेत वसलेल्या प्रबोधिनीला संशोधन केंद्राचा दर्जा देण्याकरिता गेले वर्षभर हालचाली सुरू होत्या. ‘स्थानिक चौकशी समिती’ने हिरवा कंदिल दाखविल्यानंतर काही निकषांची पूर्तता करण्याच्या अटीवर विद्यापीठाने प्रबोधिनीला संशोधन केंद्र म्हणून मान्यता दिली. त्यामुळे, आता प्रबोधिनीमार्फत राज्यशास्त्रात पीएचडी आणि संशोधनाच्या माध्यमातून एमए करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाची पदवी मिळविता येणार आहे.
एका विशिष्ट विषयावर काम करणाऱ्या अशैक्षणिक संस्थेला विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार संशोधनाचा दर्जा देता येतो. मात्र, संशोधनाकरिता आवश्यक असलेले तज्ज्ञ मार्गदर्शक, संदर्भ साहित्य, संगणक, इंटरनेट, अभ्यासिका आदी पायाभूत सुविधा संस्थेकडे असणे आवश्यक आहेत. लोकप्रतिनिधीच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून लोकशाहीच्या संबंधात वैशिष्टय़पूर्ण काम करणारी प्रबोधिनी ही दक्षिण आशियातील पहिली आणि एकमेव संस्था असल्याचा दावा केला जातो. प्रबोधिनीकडे जवळपास १४ हजार पुस्तकांचे सुसज्ज ग्रंथालय, बहुतेक प्रमुख राजकीय पक्षांचे गेल्या ५० वर्षांतील जाहिरनामे संग्रही आहेत. हिंदुत्त्ववादी विचारांबरोबरच डावे विचार आणि विचारसरणीशी संबंधित संदर्भाचे स्वतंत्र दालन आहे. तसेच, ‘माणूस’ साप्तहिकाचेही अतिशय जुने अंक संग्रही आहे. इकॉनॉमिक अ‍ॅण्ड पॉलिटिकल विकली, सेमिनार ही राज्यशास्त्राच्या अभ्यासकांकरिता आवश्यक असलेली जर्नल्सही प्रबोधिनीकडे येतात. या शिवायही काही आंतरराष्ट्रीय स्तरावरील जर्नल्स उपलब्ध असणे आवश्यक आहेत. परंतु, त्यांचीही आम्ही वर्गणी भरली असून ती अभ्यासाकरिता उपलब्ध होतील, असे प्रबोधिनीचे महासंचालक विनय सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले. जून-जुलैपासूनच नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्याचा प्रबोधिनीचा विचार आहे. प्रा. वनिता बैजल, प्रा. स्वाती पितळे, प्रा. महेश भागवत हे राज्यशास्त्राचे प्राध्यापक मानद संशोधक म्हणून काम करणार आहेत.

विशिष्ट विचारधारेशी संबंधित असलो तरी..
प्रबोधिनीची स्थापना जरी एखाद्या विचारधारेशी संबंधित म्हणून झाली असली तरी आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, शेकाप अशा सर्वच पक्षाचे तरूण कार्यकर्ते आमच्याकडे प्रशिक्षणाकरिता येतात. एका प्रशिक्षणात तर कार्यकर्त्यांची संघटना वेगळी असली पाहिजे, असा सूर कार्यकर्त्यांनी लावला होता. कारण, सर्वच पक्षाच्या नेत्यांचा आपल्या नेतृत्त्वावर राग असावा. त्यामुळे, अशा प्रकारची प्रशिक्षण संस्था म्हणून प्रबोधिनी मान्यताप्राप्त झाली आहे. या उपक्रमांमधील अनेक प्रकारची हकिकती, निष्कर्ष, अनुभव या माध्यमातून ज्ञानसंपदा जमा होत राहते. या ज्ञानसंपदेचा उपयोग राज्यशास्त्रात संशोधन करू इच्छिणाऱ्यांना निश्चितपणे होईल. त्यांच्यासोबत असण्याचा संस्थेलाही वेगळ्या पद्धतीने उपयोग करून घेता येईल.
-विनय सहस्त्रबुद्धे, महासंचालक, राम भाऊ म्हाळगी प्रबोधिनी