प्रकाश आंबेडकरांचे जाहीर आव्हान ; आठवले यांचा संघाला इशारा
जातीवर आधारित आरक्षण संपवा, या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारप्रमुख मनमोहन वैद्य यांच्या विधानाचा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि भारिप-बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र निषेध केला आहे. जातीवर आधारित आरक्षण असणे देशाच्या हिताचे नाही, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कुठे म्हटले आहे, त्याचे पुरावे द्यावेत असे आव्हान आंबेडकर यांनी वैद्य यांना दिले आहे. तर आरक्षण संपविण्याचा डाव हाणून पाडला जाईल, असा इशारा आठवले यांनी संघाला दिला आहे.
जयपूर येथील सहित्य महोत्सवात बोलताना मनमोहन वैद्य यांनी जातीवर आधारित शासकीय नोकऱ्यांतील व शिक्षणातील आरक्षणाला विरोध केला. जातीवर आधारित आरक्षणामुळे भारतात फुटीरवाद वाढीस लागल्याचे खळबळजनक विधानही त्यांनी केले. जातीवर आधारित आरक्षण कायम राहणे कुठल्याची देशाच्या हितासाठी चांगले नाही, असे डॉ. आंबेडकर यांनी म्हटल्याचा दावाही त्यांनी केला आहे. वैद्य यांच्या या विधानाचे मागासवर्गीय समाजात तीव्र पडसाद उमटले आहेत.
केंद्रातील भाजप सरकारमध्ये मंत्री असलेले रामदास आठवले यांनीही वैद्य यांच्या भूमिकेचा तीव्र निषेध केला आहे. जातीवर आधारित आरक्षणाची घटनेतच तरतूद करण्यात आली आहे. देशात जोपर्यंत जातिव्यवस्था व जातिभेद आहे, तोपर्यंत जातीवर आधारित आरक्षण राहणार आहे. दलित, आदिवासी, ओबीसींचा हा घटनात्मक अधिकार हिरावून घेण्याचा डाव हाणून पाडला जाईल, असा इशारा त्यांनी संघाला दिला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विधानाचा हवाला देऊन वैद्य यांनी जातीवर आधारित आरक्षणाला विरोध केला आहे. त्याचा प्रकाश आंबेडकर यांनी खरपूस समाचार घेत भारिप-बहुजन महासंघाच्या वतीने त्याचा तीव्र धिक्कार केला आहे. जाती आधारित आरक्षणाला बाबासाहेबांनी कुठे विरोध केला होता, त्याबद्दलचे पुरावे द्यावेत, असे जाहीर आव्हान त्यांनी वैद्य यांना दिले आहे.