मुंबई अध्यक्ष गौतम सोनावणे यांना उमेदवारी
मुंबई : भाजपने आपला मित्र पक्ष असेलल्या रिपब्लिकन पक्षाला सहा जागा दिल्या, परंतु शिवसेनेने मुंबईतील मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघावरचा दावा कायम ठेवल्याने या मतदारसंघात रिपाइं व शिवसेना यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. रिपब्लिकनचे मुंबईचे अध्यक्ष गौतम सोनावणे यांनी शुक्रवारी उमेदवारी दाखल केली.
महायुतीतील घटक पक्ष म्हणून ही जागा रिपब्लिकन पक्षाला मिळायला हवी होती, परंतु तेथे शिवसेनेने उमेदवार दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. कार्यकर्त्यांची नाराजी दूर करून ही निवडणूक जोमाने लढण्याचा पक्षाचा प्रयत्न राहील, असे सामाजिक न्याय राज्यमंत्री व पक्षाचे सरचिटणीस अविनाश महातेकर यांनी सांगितले.
भाजपने रिपब्लिकन पक्षाला मुंबईतील मानखुर्द-शिवाजीनगर, तसेच फलटण, माळशिरस, पाथरी, नायगाव व भंडारा या सहा जागा सोडल्या होत्या. पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी तशी घोषणा केली होती. त्यांनी चार मतदारसंघांतील उमेदवारही जाहीर केले होते. त्यात मानखुर्द-शिवाजीनगरमधून गौतम सोनावणे व फलटणमधून दीपक निकाळजे यांची नावे जाहीर करण्यात आली होती.
पक्षाध्यक्ष आठवले यांनी गुरुवारी फलटण मतदारसंघातून निकाळजे यांच्याऐवजी दिगंबर आगाव यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र आपण स्वत:च फलटणमधून निवडणूक लढण्यास नकार दिल्यामुळे अन्य कार्यकर्त्यांला उमेदवारी दिल्याचा दीपक निकाळजे यांनी खुलासा केला आहे.
मानखुर्द-शिवाजीनगर या मतदारसंघातून शिवसेनेने विठ्ठल लोकरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे रिपाइंची पंचाईत झाली. तरीही गौतम सोनावणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात आता महायुतीतच शिवसेना व रिपाइं यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होणार आहे.