मुंबई : वन्यप्राणी आणि त्यांचा अधिवास सुरक्षित राहावा यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालयात (राणीची बाग) वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यावरण आणि वन्यजीवांवर आधारित छायाचित्रण, चित्रकला, निसर्ग प्रबोधन खेळ, चर्चासत्र, व्याख्याने, कार्यशाळा, मरीन वॉक, नेचर ट्रेल्स, माहितीपट, वन्यजीव नाटक आदी विविध कार्यक्रमांचे या आठवड्यात आयोजन करण्यात आले आहे.

भारतीय वन्यजीवांच्या वैविध्याचा उत्सव साजरा करणे, त्यांच्या संरक्षणासाठी जनजागृती करणे आणि भावी पिढ्यांमध्ये निसर्गाप्रती आदर निर्माण करणे हा या महोत्सवामागील मुख्य उद्देश आहे. दरवर्षी देशात २ ते ८ ऑक्टोबरदरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो. त्यानुसार राणीच्या बागेतही वन्यजीव सप्ताह साजरा केला जात आहे.

राणीच्या बागेत मंगळवार, ३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता निसर्ग भ्रमंती, तर दुपारी १२.३० वाजता माहितीपट प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. ४ ऑक्टोबर रोजी लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यांनतर, दिवसभर विविध परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत. दरम्यान, ६ ऑक्टोबर रोजी पुन्हा सकाळी निसर्गभ्रमंती करण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे. त्यांनतर कोकेडामा कार्यशाळा घेऊन पुन्हा हाजी अली येथील समुद्रकिनारी फेरफटका मारता येणार आहे. दरम्यान, ‘वन की बात’ या विशेष कार्यक्रमात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून वन्यजीवांचे विविध रोचक आणि मजेशीर बाबी ऐकण्याची संधी मिळेल. संगीता खरात व वीरेंद्र नायडू हे जंगलातील गोष्टींवर माहिती देतील.

या महोत्सवात, वन्यजीव संवर्धनासाठी कार्यरत असलेले महाराष्ट्र वनविभाग, कांदळवन प्रतिष्ठान, डब्ल्यूसीएस इंडिया, सीसीएफ, सृष्टीज्ञान, सह्याद्री संकल्प सोसायटी, सीताई क्रिएशन्स, नॅचरेलिस्ट एक्सप्लोरर, जेन गुडाल इंस्टिट्यूट इंडिया, सीड स्टोरीज, ग्रीन वर्क ट्रस्ट, स्पेक्ट्रम, मॅड फॅक्टर मीडिया यांसारख्या अग्रगण्य संस्था, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक, निसर्गप्रेमी गट आणि स्वयंसेवक एकाच व्यासपीठावर एकत्र येत आहेत. तसेच, वन्यजीव सप्ताहादरम्यान घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा ८ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.

वन्यजीव सप्ताहाची सुरुवात कशी झाली ?

वन्यजीवांच्या निसर्गातील महत्त्वाच्या बाबींविषयी, त्यांच्या जनजागृतीविषयी माहिती व्हावी म्हणून केंद्रीय वन्यजीव मंडळाने वन्यजीव सप्ताहासाठी पुढाकार घेतला. केंद्रीय वन्यजीव मंडळाच्या स्थापनेनंतर भारतातील वन्यजीवांच्या संरक्षणाच्या दीर्घकालीन उद्दिष्टांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी १९५२ साली वन्यजीव सप्ताहाची संकल्पना मांडण्यात आली. सुरुवातीला १९५५ साली वन्यजीव दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर १९५७ मध्ये वन्यजीव सप्ताहाची सुरुवात झाली.