बहिरी ससाणा, राखी धनेश, ठिपकेवाल्या पिंगळ्याचा अधिवास
माणसांनी सदैव गजबजलेला असणारा आणि गगनचुंबी इमारतींचा परिसर बनत असलेल्या दादर परिसराच्या काही भागांत आजही विपुल वृक्षसंपदा आणि शांती अनुभवता येते. दादर पूर्वेकडील हिंदू, पारसी कॉलनी तसेच पाच उद्यान (फाइव्ह गार्डन) परिसरात रस्त्याच्या कडेला आणि इमारतींच्या आवारात अनेक डेरेदार वृक्ष असल्याने येथे पक्ष्यांची किलबिलही नेहमीच कानी पडते. मात्र, याच परिसरात आता दुर्मीळ पक्ष्यांनीही कायमस्वरूपी घरोबा करण्यास सुरुवात केली आहे. उंच आणि बहरलेल्या झाडांनी व्यापलेल्या या भागांमध्ये बहिरी ससाणा, राखी धनेश, ठिपकेवाला पिंगळा अशा सहसा दर्शन दुर्लभ झालेल्या पक्ष्यांचा अधिवास असल्याचे आढळून येत आहे.
मुंबईच्या इतर परिसराच्या तुलनेत मध्यवर्ती असलेला हिंदू आणि पारसी कॉलनी तसेच पाच उद्यान परिसर शांत आहे. तसेच, अनेक डेरेदार व जुन्या वृक्षांनी बहरलेला आहे. इथल्या हरित पट्टय़ामुळे मुंबईत क्वचितच दिसणाऱ्या पक्ष्यांनी येथे आसरा घेतल्याचे दिसून येत आहे. सर्वाधिक वेगवान अशा बहिरी ससाण्याचा अधिवास या ठिकाणी आढळून आला आहे. याशिवाय राखी धनेश (इंडियन ग्रे हॉनबिल), ठिपकेवाला पिंगळा (स्पॉटेड आऊल) यांसारख्या पक्ष्यांची घरटी देखील याठिकाणी दिसून येत आहेत.
गेल्या तीन वर्षांपासून ‘विवांत अनटेंम्ड अर्थ फाऊंडेशन’तर्फे या ठिकाणी आढळणाऱ्या जैवविविधतेचे निरीक्षण केले जात आहे. सध्या दादर पश्चिम परिसरात बहिरी ससाण्याच्या घरटय़ाची नोंद करण्यात आली आहे. शिकारी पक्ष्यांच्या गटामध्ये याचा समावेश होतो. सुमारे ताशी ११० किलोमीटर वेगाने हा पक्षी उडू शकतो. तसेच मार्च ते मे महिन्याच्या कालावधीत हे पक्षी उंच ठिकाणी आपले घरटे बांधतात.
दोन आठवडय़ांपासून बहिरी ससाण्याची जोडी दादर पश्चिम परिसरात वावरत असल्याचे निरीक्षण फाऊंडेशनचे प्रमुख सदस्य किशोर ठाकूर यांनी नोंदविले. येथील एका इमारतीच्या ४० व्या मजल्यावर या पक्ष्याचे घरटे आहे. बहिरी ससाणा पक्षी उंचावरून वेगाने सूर मारून छोटय़ा पक्ष्यांची शिकार करीत असल्याने उंचावर घरटी बांधत असल्याची माहिती पक्षीनिरीक्षक विजय अवसरे यांनी दिली.याशिवाय तांबट, दयाळ, जांभळा सूर्यपक्षी, मैना, पहाडी पोपट, हळद्या, गव्हाणी घुबड, पाणकावळा, शिंपी, खंडय़ा यांसारखे पक्षी आणि सारंगगाराची (बगळ्यांची वसाहत) नोंद या परिसरात झाली आहे. मुख्य म्हणजे जुन्या वृक्षांच्या ढोलीमध्ये राखी धनेश आणि ठिपकेवाल्या पिंगळ्यांच्या घरटय़ांची नोंद झाली आहे.
वृक्षछाटणीचा फटका
नागरी वसाहत असूनही तुलनेत दादर पूर्वेचा परिसर शांत आहे. त्यामुळे विविध पक्षी येथे आसरा घेत असल्याचे ‘विवांत अनटेंम्ड अर्थ फाऊंडेशन’चे संस्थापक डॉ. संजीव शेवडे यांनी सांगितले. मात्र दरवर्षी पावसाळ्यापूर्वी अंधाधुंद पद्धतीने होणाऱ्या फांद्यांच्या छाटणीमुळे येथील पक्ष्यांच्या घरटय़ांमधील किमान ५० टक्के घरटी उद्ध्वस्त होत असल्याने ही पक्षीसंपदा धोक्यात येत असल्याचे ते म्हणाले.
बहिरी ससाणा पक्ष्यांनी शहरी अधिवासाला आत्मसात केले असून उंच मजली इमारतींवर त्यांनी घरटी बांधण्यास सुरुवात केली आहे. शिवाय शहरी भागात कबुतरांची संख्या वाढली आहे. त्यांच्या शिकारीसाठी या पक्ष्याचा अधिवास नागरी वसाहतींजवळ वाढला आहे.
– अविनाश भगत, पक्षीनिरीक्षक-अभ्यासक