मुंबई : राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या आठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृहमंत्रालयाने मंगळवारी जारी केले. मुंबई रेल्वेचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांची राज्य गुप्तवार्ता विभागात सह आयुक्त पदावर आणि मुंबईतील उत्तर विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त अभिषेक त्रिमुखे यांची विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशासन पदावर बदली करण्यात आली आहे.

गृहमंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, राज्य गुप्तवार्ता विभागातील सह आयुक्त शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदी बदली करण्यात आली असून राज्य गुप्तवार्ता विभागातील सह आयुक्त पदी शिसवे यांच्या नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर शहरचे सह आयुक्त निस्सार तांबोळी यांची राज्य राखीव पोलीस बल नागपूर येथे विशेष पोलीस महानिरीक्षक पदी बदली करण्यात आली असून तांबोळी यांच्या बदलीने रिक्त झालेल्या नागपूरसह आयुक्त पदावर अमरावतीचे पोलीस आयुक्त एन. डी. रेड्डी यांची बदली करण्यात आली आहे.

राज्य राखीव पोलीस बलाचे विशेष पोलीस महानिरीक्षक राजीव जैन यांची सागरी सुरक्षा विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदी आणि नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या सुप्रिया पाटील – यादव यांची विशेष पोलीस महानिरीक्षक अस्थापना पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या आदेशाने भापोसे अधिकारी आरती सिंह यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या नियुक्तीचे स्वतंत्र आदेश काढण्यात येतील, असे गृहविभागाने स्पष्ट केले आहे.