करोनाबाधित असल्याची खात्री करूनच उपचार
शैलजा तिवले
मुंबई : बाजारात उपलब्ध असलेल्या चाचणी संचाद्वारे केलेल्या चाचणीत करोनाबाधित आढळलेल्या रुग्णांची पुन्हा चाचणी करण्याची आवश्यकता नाही, असे केंद्रीय आरोग्य विभागाने सोमवारी स्पष्ट केले. परंतु अशा रुग्णांना उपचारासाठी दाखल करायचे असल्यास गृह चाचणी ग्राह्य न धरता त्यांच्या पुन्हा चाचण्या करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. मुंबईत जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात दैनंदिन रुग्णांची संख्या जवळपास १८ ते १९ हजारांवर गेली. या काळात घरच्या घरी चाचण्या करता येणाऱ्या रॅपिड अॅन्टीजेन चाचण्यांच्या वापराकडे नागरिकांचा कल मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. या चाचण्यांमधून २० मिनिटांत निदान होत असल्यामुळे तसेच गृह विलगीकरणासह अन्य निर्बंधांपासून सुटका मिळविण्यासाठीही याची बाजारात मागणी वाढली आहे.
रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्यामुळे प्रयोगशाळांवरील ताणही वाढला आहे. त्यामुळे ‘आरटीपीसीआर’ अहवाल येण्यास ४८ तासांपेक्षा अधिक कालावधी लागत आहे. चाचण्यांवरील ताण कमी करण्यासाठी म्हणून केंद्रीय आरोग्य विभागाने सुधारित नियमावली सोमवारी जाहीर केली. यानुसार, घरच्या घरी चाचणी केल्यास आणि यात रुग्ण बाधित आढळल्यास पुन्हा चाचणी करण्याची आवश्यकता नाही. तसेच रुग्णाला लक्षणे असूनही चाचणीमध्ये बाधित नसल्याचे दिसून आल्यास ‘आरटीपीसीआर’ करावी, असे स्पष्ट केले आहे. पालिकेने मात्र घरच्या घरी केलेल्या चाचण्यांच्या निष्कर्षांवर रुग्णास करोनाचे उपचार न करण्याचा निर्णय घेतला आहे.
‘रुग्णाने घरी चाचणी केल्यानंतर आयसीएमआरच्या संकेतस्थळावर नोंद न केल्यास रुग्ण बाधित आहे याचा कोणताही पुरावा आमच्याकडे नाही. त्यामुळे रुग्ण लक्षणांमुळे रुग्णालयात दाखल झाल्यास त्याच्यावर करोनाचे उपचार करणे योग्य नाही. अशा स्थितीमध्ये रुग्णाला रुग्णालयात अन्य विभागात ठेवून उपचार दिले जातील. परंतु खात्रीसाठी पुन्हा ‘आरटीपीसीआर’ चाचणी करूनच करोनाच्या विभागात दाखल केले जाईल, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले. घरातल्या घरात केल्या जाणाऱ्या चाचण्यांचे अहवाल अचूक वा खात्रीशीर नसल्यामुळे त्याआधारे थेट उपचार करणे धोक्याचे आहे, असेही ते म्हणाले.
घरगुती चाचणी संचांच्या विक्रीत वाढ
डिसेंबरपूर्वी महिन्यातून एकदा एखादे होम टेस्ट किट खरेदी केले जात होते. परंतु जानेवारीमध्ये याची मागणी अचानक वाढली असून दिवसभरात जवळपास २० ते २५ किटची विक्री होते, असे दादरमधील फार्मा असोसिएशनचे अजय जोशी यांनी सांगितले. घरच्या घरी चाचण्या करता येणाऱ्या विविध अशा ११ चाचणी संचांना भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने मान्यता दिली आहे. यातील जवळपास चार ते पाच प्रकारचे संच सध्या बाजारात उपलब्ध आहेत. या संचाची किंमत अडीचशे रुपये आहे.
कंपन्यांकडून मागणी
काही कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या चाचण्या करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात संच खरेदी करतात, तर काही जण घरकामगारांच्या चाचण्यांसाठी संच घेऊन जातात, अशा जवळपास ४० ते ५० संचांची मागणी असल्याचे अंधेरीच्या फार्मा असोसिएशनचे प्रेमल मेहता यांनी सांगितले.
अहवालाची नोंद करण्यास टाळाटाळ
घरातल्या घरात केल्या जाणाऱ्या चाचण्यांच्या अहवालांची ‘आयसीएमआर’च्या संकेतस्थळावर नोंद करणे अपेक्षित आहे. परंतु, बहुतांश नागरिक हे करणे टाळतात व परस्पर उपचार घेतात. त्यामुळे मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्या आहे त्यापेक्षा अधिक असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
घरी चाचण्या करण्याचे प्रमाण वाढले ही सकारात्मक बाब आहे. यामुळे का होईना रुग्ण वेळेत चाचणी करून घरी विलगीकरणात राहतील आणि लक्षणांप्रमाणे उपचारही घेतील. या अहवालांची नोंद मात्र नागरिकांनी जागरूकतेने संबंधित यंत्रणेमध्ये करणे गरजेचे आहे. यामध्ये बाधित आढळलेल्या रुग्णांची विनाकारण पुन्हा चाचणी करण्याची आवश्यकता नाही. यामुळे चाचण्यांवरील ताण आणखी वाढण्याची शक्यता आहे.
– डॉ. शशांक जोशी, करोना कृतिदलाचे सदस्य