‘आता राज ठाकरेंनी स्वतःच्या पैशाने रस्ते बांधून फुकट वापरायला द्यावेत. त्याचबरोबर सेनाभवन समोरचा टॉवर लोकांना फुकट वापरायला देऊन टाकावा…’ इथपासून, ‘गंडे दोरे अगरबत्त्या विकून मतदारांना लुटण्यापेक्षा माणसे आणि माणुसकी जपण्याचे काम मनसे करीत आहे. मतदार शहाणे आहेत. ते गंडे, दोरखंड आणून बांधले तरी बंडलबाजीला कंटाळले आहेत…’ इथपर्यंत.
राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱयांना टोल न भरण्याचे आदेश दिल्यानंतर रविवारी रात्री आणि सोमवारी दिवसभर राज्यात विविध ठिकाणी मनसैनिकांनी ‘टोल’फोड केली. टोल का घेतला जातोय, हे सांगितले जात नाही, तोपर्यंत टोल भरू नका. टोल मागायला कोणी आडवे आले, तर तुडवून काढा, असा आदेशच राज ठाकरे यांनी दिला. राज ठाकरेंच्या या भूमिकेवर मराठी ऑनलाईन विश्वात समिश्र स्वरुपाच्या प्रतिक्रिया उमटल्या. ‘लोकसत्ता डॉट कॉम’कडे नेटिझन्सनी व्यक्त केलेल्या काही प्रतिक्रियांमध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही केवळ स्टंटबाजी असल्याचे काहींनी म्हटले आहे, तर काहीजणांनी मनसेने लोकांना रोज भेडसावणाऱया प्रश्नाला हात घातल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.
कृष्णा कडू या वाचकाने या आंदोलनावरून राज ठाकरेंवरच हल्लाबोल केला. ते म्हणतात, आता राज ठाकरेंनी स्वतःच्या पैशाने रस्ते बांधून फुकट वापरायला द्यावेत. त्याचबरोबर सेनाभवन समोरचा टॉवर लोकांना फुकट वापरायला देऊन टाकावा.
फक्त मतांसाठी सगळे चालू आहे. निवडणुकीला तीन महिने आहेत. आता जाग आली यांना, अशी प्रतिक्रिया दिली आहे पवन याने.
नीलेशने म्हटले आहे की, १२ आमदार असणाऱया पक्षाला असे करण्याची काहीही गरज नाही. हा मुद्दा ते विधानसभेत उपस्थित करू शकले असते. पण फक्त ढोंग करायचे ठरवल्यावर दुसरे काय करणार.
सागर पाटील म्हणतो, मनसेने पुन्हा एकदा टोलफोड सुरु केली. मधे येईल त्याला चेचून काढा, असे हिंसेला उद्युक्त करणारे भाषण करून राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना चिथावणी दिली आहे. आम आदमी पक्षाचा वाढता प्रभाव नाशिक महानगरपालिकेत सत्ता असूनही काही ठोस न करता आल्याचे वैफल्य आणि विकासाची ब्लू प्रिंट हे जनतेला अनेक वर्षे दाखवलेले गाजर प्रत्यक्षात आणण्याची असमर्थता यामुळे राज यांना असले उद्योग सुचत असावेत.
दहा दहा लाखांच्या गाड्या वापरतात. यांना १०० रुपये टोल द्यायला काय हरकत आहे? असा प्रश्न विचारून अविनाश म्हणतात, मनसेने विधायक कामे करावी. हा पोरखेळ सोडून द्यावा.
एकीकडे काही वाचकांनी राज ठाकरेंच्या आदेशावर कडवी टीका केली असताना दुसरीकडे अनेकजणांनी त्याचे समर्थनही केले.
प्रदीप म्हणतो, गंडे दोरे अगरबत्त्या विकून मतदारांना लुटण्यापेक्षा माणसे आणि माणुसकी जपण्याचे काम मनसे करीत आहे. मतदार शहाणे आहेत. ते गंडे, दोरखंड आणून बांधले तरी बंडलबाजीला कंटाळले आहेत.
काय बोलायचं! चोर सरकार हे टोल नाके बंद करणार नाही. त्यांना अशाच पद्धतीचे उत्तर हवे, असे म्हटले आहे हेमत याने.
विष्णू माने म्हणतो, वा वा हे फार बरे झाले, कोट्यवधींची लूट याने थांबेल, कायदा फक्त कॉंग्रेसची मक्तेदारी नाही.
संजय म्हणतो, शिवसेनेच्या कमकुवत तकलादू राजकारणाला आणि कॉंग्रेसी राजकारणाला लोक कंटाळले आहेत. मनसे सेनेची जागा भरून काढत आहे, ते योग्यच आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reactions on raj thackerays statement against toll in maharashtra
First published on: 28-01-2014 at 12:30 IST