मुंबई : दहिसर पूर्व येथे द्रुतगती मार्गावर झालेल्या अपघातात दुचाकीवरील मीत चितरोडा (२१) या तरुणाचा मृत्यू झाला. या अपघातात त्याच्यासोबत प्रवास करणारी तरुणीही गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी बुधवारी मृत तरुणाविरोधात निष्काळजीपणे दुचाकी चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

दहिसर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई पंडित राठोड या प्रकरणातील तक्रारदार आहे. २० मे रोजी ते कर्तव्य बजावत असताना त्यांना दहिसर पूर्व येथील ओवरी पाडा येथे दुचाकीचा अपघात झाल्याचे समजले. त्यानुसार ते घटनास्थळी गेले असता एक तरुण व तरुणी जखमी अवस्थेत तेथे पडल्याचे दिसून आले. त्यानुसार त्यांना शताब्दी रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी तरुणाला मृत घोषित केले. तर तरुणीवर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा : परदेशातील उच्च शिक्षणाच्या संधी, कौशल्य विकासाबाबत मार्गदर्शन; तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि शंकानिरसनाची संधि

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार तरुणाचे दुचाकीवरून नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरून दुभाजकाला धडक दिली. पश्चिम द्रुतगती मार्गावरील उत्तर वाहिनीवर हा अपघात घडला. त्यानुसार दुचाकी भरधाव वेगाने चालवून अपघात केल्याप्रकरणी मीत चितरोडाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जखमी तरुणीवर सध्या उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.