मुंबई : फौजदारी खटला टाळण्यासाठी आपण भारत सोडलेला नाही किंवा भारतात परतण्यास आपण तयार नाही असे नाही. तर आपले पारपत्र निलंबित केले गेले आहे. त्यामुळे, आपण भारतात परतू शकत नाही, असा दावा कोट्यवधी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील प्रमुख आरोपी मेहुल चोक्सी याने मुंबईतील विशेष न्यायालयात एका अर्जाद्वारे केला आहे.

तसेच, त्याला भारतात परतायचे नाही हे सांगणारी आणि त्याच्या पारपत्र निलंबनाशी संबंधित कागदपत्रे सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) सादर करण्याचे आदेश देण्याची मागणीही केली आहे.

हेही वाचा : मुंबई: २६३ कोटींचे प्राप्तिकर गैरव्यवहार प्रकरण, अटकेतील आरोपीच्या घरातून कागदपत्र जप्त

आपण देश सोडल्यानंतर आपल्याविरोधात खटला दाखल करण्यात आला, त्यापूर्वी नाही, असा दावा देखील चोक्सी याने विशेष न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात केला आहे. चोक्सी याला फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित करण्याची मागणी ईडीने विशेष न्यायालयात केली आहे. याच प्रकरणी चोक्सीने उपरोक्त अर्ज केला आहे. तसेच, संबंधित कागदपत्रे प्रकरणाच्या न्याय्य निर्णयासाठी सादर करण्याचे आदेश देणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा : Porsche Accident: “दोन बळी घेणाऱ्या मुलाला पिझ्झा, बर्गर कुणी दिला?” राऊतांपाठोपाठ सुप्रिया सुळेंचा सवाल

चोक्सीने फौजदारी कारवाई टाळण्यासाठी देश सोडल्याचे किंवा त्याने परत येण्यास नकार दिल्याचे ईडी सिद्ध करू शकलेली नाही. किंबहुना, आपण २०१८ मध्ये ईडीच्या समन्सला प्रतिसाद दिला होता. तसेच, पारपत्र निलंबनामुळे भारतात परतण्यास असमर्थ असल्याचे कळवले होते. पारपत्र कार्यालयाने बजावलेली नोटीस चोक्सी याने विशेष न्यायालयात केलेल्या अर्जासह जोडली आहे. त्यात, देशाच्या सुरक्षेला धोका असल्याने पारपत्र निलंबित केले जात असल्याचे नमूद केले आहे.