मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) २६३ कोटी रुपयांच्या प्राप्तिकर गैरव्यवहाराप्रकरणी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे पती पुरुषोत्तम चव्हाण यांना अटक केली होती. त्यांच्या सदनिकेत राबवण्यात आलेल्या शोध मोहिमेत मालमत्तांविषयक कागदपत्रे, परदेशी चलन व मोबाइल जप्त करण्यात आल्याची माहिती ईडीने दिली.

यापूर्वी, या प्रकरणात माजी वरिष्ठ कर सहाय्यक तानाजी मंडल अधिकारी, त्यांचे साथीदार भूषण पाटील, राजेश शेट्टी व राजेश बत्रेजा या तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. २००७-०८ आणि २००८-०९ या आर्थिक वर्षांसाठी बनावट परतावा जारी केल्याप्रकरणी अतिरिक्त महासंचालक (दक्षता)-४ सीबीडीटी यांनी लेखी तक्रारी केली होती. त्याप्रकरणी दिल्ली सीबीआयने गुन्हा दाखल केला होता.

हेही वाचा : Porsche Accident: “दोन बळी घेणाऱ्या मुलाला पिझ्झा, बर्गर कुणी दिला?” राऊतांपाठोपाठ सुप्रिया सुळेंचा सवाल

याप्रकरणी ईडीने केलेल्या तपासानुसार, १५ नोव्हेंबर २०१९ ते ४ नोव्हेंबर २०२० या कालावधीत अधिकाऱ्यांनी एकूण १२ बनावट टीडीएस परताव्यांद्वारे २६३ कोटी ९५ लाख ३१ हजार ८७० रुपयांचा गैरव्यवहार केला. ती रक्कम भूषण पाटील याच्या मालकीच्या कंपनीच्या बँक खात्यात जमा झाली. ती रक्कम पुढे भूषण पाटील व इतर संबंधित व्यक्तींच्या बँक खात्यामध्ये, तसेच बनावट कंपन्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आली. यापूर्वी याप्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी राजेश बत्रेजाने ही रक्कम इतरत्र वळवण्यास आरोपींना मदत केली.