उद्योग, व्यापाऱ्यांकडून मिळणाऱ्या निधीला ओढ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : देशातील विविध उद्योगक्षेत्रांत निर्माण झालेली मंदी आणि बाजारातील निरुत्साह याचा फटका यंदाच्या गणेशोत्सवालाही बसण्याची चिन्हे आहेत. आर्थिक पातळीवर असलेल्या उदासीनतेमुळे उद्योग जगत तसेच व्यापारीवर्गाकडून गणेशोत्सव मंडळांकडे येणारा निधीचा ओघही आटला आहे. त्यातच उच्च न्यायालय आणि सरकारने गणेशोत्सवादरम्यान कठोर जाहिरात धोरण आखले असल्यामुळे मंडळांना जाहिरातींतून उत्सवाचा निधी उभा करणेही कठीण बनले आहे.

तीन वर्षांपूर्वी केंद्र सरकारने केलेल्या नोटाबंदीनंतर बाजारात निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे गणेशोत्सव मंडळांना मोठी झळ बसली होती. त्यानंतर गेल्या दोन-तीन वर्षांपासून अनेक लहान-मोठय़ा मंडळांचे बजेट कोलमडत आहे. यंदा गणेशोत्सवासाठी मंडळांना मिळणाऱ्या निधीत मागील वर्षांच्या तुलनेत सुमारे २५ टक्के घट झाली आहे. तसेच या वर्षी  पूरग्रस्तांना मदत देण्यात गणेश मंडळांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे या वर्षी गणेश मंडळांना आर्थिक चणचणीला सामोरे जावे लागत असून कार्यकर्त्यांच्या देणगीवर अवलंबून राहावे लागणार आहे, असे गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरेश दहिबावकर यांनी सांगितले.

मुंबई प्रेस क्लब आणि गणेशोत्सव समन्वय समिती यांच्या वतीने गणपती उत्सवानिमित्त पत्रकारांसोबत वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन आझाद मैदान येथील मुंबई प्रेस क्लबमध्ये करण्यात आले होते. त्या वेळी दहिबावकर बोलत होते. समितीचे कार्याध्यक्ष कुंदन आगासकर, गिरीश वालावलकर, सतीश नाईक आदी उपस्थित होते.

मंडळे सुरक्षासज्ज

काश्मीरमधील ३७० कलम रद्द केल्यानंतर देशातील मुख्य शहरांमध्ये असलेल्या ‘हाय अ‍ॅलर्ट’च्या पाश्र्वभूमीवर गणेशोत्सवात सुरक्षेसंबंधीच्या उपाययोजनांवर बोलताना दहिबावकर म्हणाले, ‘मंडळांनी पोलीस प्रशासनावर गणेशोत्सवातील सुरक्षिततेसाठी ताण न देता कार्यकर्त्यांनाही प्रशिक्षित करून त्यांच्यावर सुरक्षिततेची जबाबदारी देण्याचे काम केले आहे. त्याचबरोबर मंडळांनी ‘मेटल डिटेक्टर’ आणि सुरक्षा उपकरणांची व्यवस्था केली आहे. पोलीस विभागाशी समन्वय साधून प्रत्येक मंडळाच्या काही कार्यकर्त्यांना गणेशोत्सवातील सुरक्षा व्यवस्थेसाठी प्रशिक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे गणेशोत्सव सुरळीत पार पडेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.

‘खड्डय़ांबाबत पालिका उदासीन’

रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांचा त्रास गणपती विसर्जन मिरवणुकीलाही जाणवतो. खड्डे बुजविण्याबाबत पालिकेकडे वेळोवेळी तक्रार देऊनही त्यांच्याकडून खड्डे बुजविण्यासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात येत नाहीत. गणेश उत्सव समितीकडून दरवर्षी पाठपुरावा करूनही पालिकेकडून आश्वासनांशिवाय आजपर्यंत कोणतेही काम झाले नाही, अशी टीका दहिबावकर यांनी या वेळी केली. पालिकेने रस्त्यांवरील खड्डे बुजविले नसल्याने दरवर्षी मंडळाचे कार्यकर्तेच स्टीलच्या प्लेट खड्डय़ांवर टाकून त्यावरून मूर्तीची ट्रॉली घेऊन जातात. खड्डय़ांमुळे मूर्तीना इजा होऊ शकते. याबाबत आम्ही वारंवार पालिकेकडे पाठपुरावा करतो. मात्र ते स्वत:ही खड्डे बुजवत नाहीत आणि कार्यकर्त्यांनाही ते काम करू देत नसल्याचा आरोपही दहिबावकर यांनी या वेळी केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Recession hit ganesh festival 2019 zws
First published on: 27-08-2019 at 02:20 IST