मंगल हनवते, लोकसत्ता

मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील रहिवाशांचे कोट्यवधी रुपये घरभाडे थकविल्याप्रकरणी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने कडक पावले उचलून संबंधित विकासकांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईचा विकासकांनी धसका घेतला असून विकासक थकीत घरभाड्याची रक्कम, तसेच आगाऊ घरभाड्यापोटी रक्कम अदा करू लागले आहेत. त्यामुळेच झोपुने विकासकांकडून आतापर्यंत थकीत आणि आगाऊ घरभाड्यापोटी ६०५ कोटी रुपये वसूल केले आहेत.

झोपु योजनेतील पात्र रहिवाशांची झोपडी पाडल्यापासून त्याला पुनर्वसित इमारतीतील घराचा ताबा देईपर्यंत रहिवाशाला दरमहा घरभाडे देणे विकासकाला बंधनकारक आहे. मात्र या नियमांचा सर्रास भंग करत विकासक रहिवाशांच्या आर्थिक अडचणी वाढवीत असल्याच्या तक्रारी मोठ्या संख्येने समोर आल्या. या तक्रारींची दखल घेत झोपु प्राधिकरणाने २०२२ मध्ये घरभाड्याच्या थकीत रकमेचा आढावा घेतला असता १५० विकासकांनी ८८० कोटी ९३ लाख ०२ हजार ६०८ रुपये थकविल्याची बाब निदर्शनास आली. पश्चिम उपनगरांतील सर्वाधिक ८५ प्रकल्पांतील विकासकांनी ६१८ कोटी ०९ लाख ८८ हजार १०० रुपये घरभाडे थकविले आहे. तर पूर्व उपनगरांतील ४९ प्रकल्पांतील विकासकांनी १६१ कोटी ४६ लाख २७ हजार ८२८ रुपये आणि मुंबई शहरातील विकासकांनी १०१ कोटी ३६ लाख ८६ हजार ६८० कोटी रुपये थकविल्याचेही निदर्शनास आले. या थकीत घरभाड्याची गंभीर दखल घेऊन झोपु प्राधिकरणाने या विकासकांवर नोटिसा बजावत थकीत रक्कम अदा करण्याचे आदेश दिले. तसेच घरभाडे वसुलीसाठी विशेष मोहीम हाती घेतली.

आणखी वाचा- पोलीस हवालदार पदांसाठी भरती, तृतीयपंथीयांना अतिरिक्त गुण देण्याच्या आदेशाला अंतरिम स्थगिती देण्यास नकार

विशेष मोहिमेअंतर्गत स्वयंघोषणापत्र सादर न करणाऱ्या थकबाकीदार विकासकांना गाळ्यांची विक्री करण्यास मनाई करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यानंतरही विकासकांनी थकीत रक्कम अदा न केल्यास महाराष्ट्र झोपडपट्टी कायद्यानुसार प्रकल्प रद्द करणे, प्रकल्प काढून घेण्याचीही तरतूद झोपु प्राधिकरणाने केली. महत्त्वाचे म्हणजे या कारवाईनंतरही विकासक पुढे आला नाही, तर त्याला थकबाकीदार म्हणून घोषित करण्याबरोबर त्याचे नाव काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय घरभाडे वसुलीसाठी २५ नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. घरभाडे थकीत राहू नये यासाठी २५ नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या कारवाईनंतर अखेर विकासक जागे होत असून थकीत घरभाडे आणि आगाऊ घरभाडे अदा करण्यासाठी विकासक मोठ्या संख्येने पुढे येऊ लागल्याची माहिती झोपु प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. १५० विकासकांनी ८८० कोटी ९३ लाख ०२ हजार ६०८ कोटी रुपये थकविले आहेत. यापैकी २५१ कोटी ९३ लाख १९ हजार २७३ रुपये थकीत घरभाडे आतापर्यंत वसूल करण्यात आले आहे, तर दुसरीकडे प्राधिकरणाच्या आगाऊ घरभाड्याच्या नवीन नियमानुसार ३५३ कोटी ८६ लाख ४३ हजार ६७९ रुपये रक्कम अदा केली आहे. पश्चिम उपनगरांतील विकासकांनी १५४ कोटी ३६ लाख ३३ हजार ८४९ रुपये, पूर्व उपनगरांतील विकासकांनी १११ कोटी १० लाख ६१ हजार ४३८ रुपये, तर मुंबई शहरातील विकासकांनी ८८ कोटी ३९ लाख ४८ हजार ३९२ रुपये आगाऊ भाडे अदा केले आहे. थकीत आणि आगाऊ घरभाड्याच्या माध्यमातून ‘झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने आतापर्यंत ६०५ कोटी ७९ लाख ६२ हजार ९५२ रुपये वसूल केले आहेत. आता उर्वरित थकीत घरभाडे शक्य तितक्या लवकर वसूल करून घेण्याचा प्रयत्न असेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

आणखी वाचा-सागरी सेतूच्या पथकरात मोठी वाढ ‘एमएसआरडीसी’चा निर्णय; सोमवारपासून लागू

६२८ कोटींची वसुली शिल्लक

मुंबईतील थकीत घरभाड्याची एकूण रक्कम ८८० कोटी ९३ लाख ०२ हजार ६०८ रुपये अशी आहे. तर आतापर्यंत यातील २५१ कोटी ९३ लाख १९ हजार २७३ कोटी रुपये वसूल करण्यात प्राधिकरणाला यश आले आहे. तर आजही ६२८ कोटी ९९ लाख ८३ हजार ३३५ रुपये इतक्या थकीत घरभाड्याची वसुली शिल्लक आहे.