अंबरनाथ येथील चिरडगाव भागातील एका पोल्ट्री फार्मवर लपवून ठेवण्यात आलेल्या रक्तचंदनाचा साठा जप्त करण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या वागळे युनिटला आले असून या प्रकरणी पोल्ट्री फार्मचे मालक राजेश कृष्णा काठवळे (३०) याला अटक केली आहे. या रक्तचंदनाची जागतिक बाजारात सुमारे सात कोटी रुपये इतकी किंमत आहे. येथील चिरडगावात राहणारे राजेश काठवळे यांचा पोल्ट्रीचा व्यवसाय असून त्यांचा गावामध्येच पोल्ट्री फार्म आहे. सध्या रिकाम्या असलेल्या या पोल्ट्री फार्ममध्ये त्यांनी रक्तचंदन लपवून ठेवले होते. ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या वागळे युनिटने मिळालेल्या माहितीच्या आधारे या फार्मवर छापा टाकला. त्यामध्ये नऊ टन ६७० किलो ग्रॅम वजनाचे रक्तचंदन जप्त करण्यात आले असून या प्रकरणी राजेशला अटक केली आहे. या प्रकरणी राजेशचे साथीदार फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.