मंगल हनवते
मुंबई : ठाण्यातील वर्तक नगर पोलीस वसाहतीचा पुनर्विकास प्रकल्प अव्यवहार्य असल्याचे म्हाडाच्या कोकण मंडळाच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. कोकण मंडळाला हा प्रकल्प आर्थिकदृष्टय़ा परवडणारा नाही. त्यामुळे हा प्रकल्प बारगळला आहे.
कोकण मंडळाने १९७३ मध्ये वर्तकनगर म्हाडा वसाहतीतील काही घरे पोलिसांना निवासस्थाने म्हणून दिली होती. मात्र, या वसाहतीतील इमारती जर्जर, धोकादायक झाल्याने मागील दहा वर्षांपासून पुनर्विकासासाठी प्रयत्न सुरू आहेत. हा पुनर्विकास मार्गी लागत नसल्याने शेवटी म्हाडाने यासाठी पुढाकार घेतला. कोकण मंडळाच्या माध्यमातून पुनर्विकास करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला होता. या पुनर्विकास प्रकल्पासाठी मंडळाने प्रस्ताव तयार करण्यात आला. या प्रस्तावानुसार पोलीस वसाहतीत ५६० घरे असून यातील ५५६ घरे पोलिसांची आहेत. उर्वरित चार घरे खासगी मालकीची आहेत. सध्या येथील अनेक इमारती पाडण्यात आल्या असून पोलिसांना अन्यत्र स्थलांतरित करण्यात आले आहे. तीन इमारतीत काही कुटुंबे वास्तव्यास असून या इमारती जर्जर झाल्या आहेत. या सर्व इमारतींचा पुनर्विकास करून पोलिसांना ५६० घरे देण्यात येणार आहेत. ही घरे ५३८ चौ. फूट क्षेत्रफळाची असणार आहेत. कोकण मंडळाला येथे अंदाजे १५ लाख चौ. फुटाचे बांधकाम क्षेत्र उपलब्ध होणार आहे.
उपलब्ध बांधकाम क्षेत्रावर पोलिसांसाठी ५६० घरे बांधल्यानंतर कोकण मंडळाला ४६० घरे सोडतीसाठी उपलब्ध होणार आहेत. ही घरे मध्यम आणि उच्च गटासाठी असणार असून येथे मंडळाला अंदाजे २०० अनिवासी गाळेही (दुकान) मिळणार आहेत. पुनर्विकासाअंतर्गत येथे ३५ मजली इमारती बांधण्यात येणार आहेत. मात्र या प्रस्तावानुसार हा प्रकल्प अव्यवहार्य ठरला असल्याची माहिती म्हाडा उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर यांनी दिली.
पुनर्विकासासाठी अंदाजे ८५० कोटी खर्च येणार असून म्हाडाला यातून केवळ ९०० कोटी महसूल मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिकदृष्टय़ा हा प्रकल्प म्हाडाला परवडणारा नाही. त्यामुळे तूर्तास प्रस्ताव राखून ठेवला असून यातून काही मार्ग काढता येतो का यावर विचार सुरू असल्याचे डिग्गीकर यांनी सांगितले.
निधीसाठी पोलिसांना विचारणा
हा प्रकल्प आर्थिकदृष्टय़ा व्यवहार्य नसल्याने सध्या प्रस्ताव बाजूला ठेवण्यात आला आहे. मात्र हा प्रकल्प शक्य तितक्या लवकर मार्गी लावणे आवश्यक आहे. त्यामुळे आता पोलीस गृहनिर्माण मंडळाकडे निधीसाठी विचारणा करण्यात येणार असल्याचेही डिग्गीकर यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 8th Apr 2022 रोजी प्रकाशित
ठाण्यातील वर्तक नगर पोलीस वसाहतीचा पुनर्विकास बारगळला; प्रकल्प अव्यवहार्य, आर्थिकदृष्टय़ा म्हाडाला पुनर्विकास परवडेना
ठाण्यातील वर्तक नगर पोलीस वसाहतीचा पुनर्विकास प्रकल्प अव्यवहार्य असल्याचे म्हाडाच्या कोकण मंडळाच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.
Written by मंगल हनवते
Updated:

First published on: 08-04-2022 at 02:23 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Redevelopment vartak nagar police colony thane stalled project impractical mhada afford redevelopment financially amy