scorecardresearch

मुंबई: अग्निशमन दलाच्या भरतीत नवा वाद; उंचीची मर्यादा कमी करा; बाळासाहेबांच्या शिवसेनेची मागणी

मुंबई अग्निशमन दलाच्या अग्निशामक या पदासाठी तब्बल ९१० जागांसाठी लवकरच भरती होणार आहे.

मुंबई: अग्निशमन दलाच्या भरतीत नवा वाद; उंचीची मर्यादा कमी करा; बाळासाहेबांच्या शिवसेनेची मागणी
फोटो-लोकसत्ता (संग्रहित छायाचित्र)

गेल्या काही वर्षांपासून रखडलेली मुंबई अग्निशमन दलातील भरती प्रक्रिया पुन्हा एकदा वादात सापडली आहे. या भरतीप्रक्रियेसाठी येणाऱ्या उमेदवारांची उंची १७२ सेमीऐवजी १६५ सेमी करावी अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना या गटाने केली आहे. या गटाच्या विभागप्रमुखांनी तसे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले आहे. त्यामुळे भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली असताना या नव्या मागणीमुळे विलंब होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> मुंबईः महाविकास आघाडीच्या मोर्चासाठी मुंबई पोलीस सज्ज; ३१७ अधिकारी व १८७० कर्मचारी तैनात

मुंबई अग्निशमन दलाच्या अग्निशामक या पदासाठी तब्बल ९१० जागांसाठी लवकरच भरती होणार आहे. सात वर्षानंतर ही भरती होणार असून लवकरच त्यासाठी जाहिरातही प्रसिद्ध केली जाणार आहे. उमेदवारांना पोलीस भरतीप्रमाणे वयाची अट दोन वर्षापर्यंत शिथिल करण्यात आली आहे. आधीच मराठा आरक्षणाचा तिढा, टाळेबंदी व नंतर अनेक तांत्रिक बाबींमुळे रखडलेली ही भरती प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आलेली असताना नवीन मागणी पुढे आली आहे. अग्निशामक पदासाठी उमेदवारांची उंची १६५ सेंमी हवी अशी अर्हता असावी अशी मागणी करण्यात आली आहे. गेली अनेक वर्षे १६५ सेंमी उंचीची मर्यादा ठेवण्यात आली होती. मात्र २०११ मध्ये त्यात बदल करून ती १७२ करण्यात आली होती. तीच अट यावेळीही कायम ठेवण्यात आली आहे. त्यात बदल करून ती पुन्हा १६५ सेंमी करावी अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे दक्षिण मुंबईतील विभाग प्रमुख दिलीप नाईक यांनी केली आहे. तसे पत्र त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले आहे.

हेही वाचा >>> मुंबई: गिरणी कामागारांसाठी २५२१ घरांची सोडत अखेर निघणार; अर्ज करण्यासाठी १९ डिसेंबर ते १७ जानेवारीपर्यंत मुदत

महाराष्ट्र राज्य अग्नि संचालनालयातर्फे अग्निशामक या पदाच्या अभ्यासक्रमासाठी किमान उंची १६५ सेमी इतकी आहे. अग्निशमन सेवेत नोकरी मिळावी म्हणून अनेक तरूण राज्य सरकारचा हा अभ्यासक्रम पूर्ण करतात. मात्र मुंबई अग्निशमन दलात या पदासाठी ते पात्र नाहीत. मुंबई अग्निशमन दलालाही राज्य सरकारच्या अग्नि संचालनालयाचे अग्निशामक पदासाठीचे नियम बंधनकारक असावे, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. नगरविकास विभागाची किंवा राज्य सरकारची परवानगी न घेता मुंबई अग्निशमन दलाने उंचीची मर्यादा बदलल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे. मुंबई वगळता राज्यातील सर्व अग्निशमन सेवांमध्ये अग्निशामकाच्या उंचीची मर्यादा १६५ सेमी आहे. त्यामुळे मुंबई अग्निशमन दलातील भरतीच्या वेळीही हीच उंचीची मर्यादा ठेवावी अशी मागणी करण्यात आली आहे.

यापूर्वी २०१७ मध्ये भरती झाली होती, तशीच भरती आता होणार आहे. बारावी उत्तीर्ण इच्छुक उमेदवारांची पारंपरिक पद्धतीने शारीरिक तपासणी, वैद्यकीय तपासणी यांचा या प्रक्रियेत समावेश आहे. मुंबई अग्निशमन दलात सुमारे तीन हजार अग्निशामक जवान, अधिकारी, वाहनचालक असे मनुष्यबळ आहे. त्यापैकी अडीच हजार अग्निशामक जवान आहेत. मात्र पदोन्नती किंवा निवृत्तीमुळे पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त झाली होती. रिक्त जागांसाठी ही भरती होणार आहे

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-12-2022 at 22:50 IST

संबंधित बातम्या