लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) टप्प्याटप्याने विविध अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश परीक्षांची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून एमबीए/ एमएमएस, एमएड, एमपीएड आणि एमसीए या अभ्यासक्रमांची नोंदणी प्रक्रिया सुरू केल्यानंतर आता विधि (तीन वर्षे) अभ्यासक्रमाच्या नोंदणी प्रक्रिया शुक्रवारपासून ( २७ डिसेंबर) सुरू करण्यात आली आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने विविध अभ्यासक्रमांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केल्यानंतर टप्प्याटप्याने सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांसाठीच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात केली आहे. व्यवस्थापन अभ्यासक्रम (एमबीए/ एमएमएस), शिक्षणशास्त्र ( एमएड), शारीरिक शिक्षणशास्त्र ( एमपीएड) आणि संगणकशास्त्र उपयोजन ( एमसीए) या अभ्यासक्रमांसाठीची नोंदणी २५ डिसेंबर रोजी सुरू करण्यात आली. आता विधि तीन वर्षे अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठीची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. नोंदणी करण्यासाठी एक महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना २७ जानेवारीपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे.

आणखी वाचा-कोकण रेल्वे मार्गावर विशेष रेल्वेगाडी

संभाव्य वेळापत्रकानुसार विधि तीन वर्षे अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा ही २० आणि २१ मार्च २०२५ रोजी होणार आहे. अन्य अभ्यासक्रमांच्या परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्याची तयारी सुरू असून टप्प्याटप्याने सर्व अभ्यासक्रमांच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होईल, अशी माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आलेल्या अभ्यासक्रमांचे ऑनलाइन अर्ज, वेळापत्रक आणि माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या http://www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याचे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे.

आणखी वाचा-मुंबई : नववर्षाच्या स्वागतासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये पदवीनंतर तीन वर्षांच्या विधि अभ्यासक्रमासाठी १९ हजार ३४१ जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी राज्यभरातून ५२ हजार ७४२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ४९ हजार २८७ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरले होते. त्यामुळे महत्त्वाच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस होती. अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांपैकी १८ हजार ७४८ विद्यार्थ्यांनी तीन वर्षाच्या विधि अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला तर ५९३ जागा रिक्त राहिल्या आहेत. संभाव्य वेळापत्रकानुसार मार्चमध्ये होणाऱ्या परीक्षांसाठीची नोंदणी प्रक्रिया नोव्हेंबरमध्ये टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे. उर्वरित अभ्यासक्रमांसाठीची नोंदणी प्रक्रिया त्यानंतर सुरू होण्याची शक्यता असल्याची मााहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातील अधिकाऱ्यांनी दिली.