लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : मुंबईसह राज्यात ठिकठिकाणची गोविंदा पथके दहीहंडी उत्सवाची तयारी करीत असून रात्रीचा जागर करून मानवी मनोरे रचण्याचा सराव करीत आहेत. यंग उमरखाडी क्रीडा मंडळ व गोविंदा पथकाने नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून बुधवार, ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता ‘चोर गोविंदा’चे (सराव शिबीर) आयोजन केले आहे. या शिबिरात ५० हून अधिक गोविंदा पथके आपले कौशल्य दाखविणार आहेत.
एकेकाळी दक्षिण मुंबईतील उमरखाडी, डोंगरी, इमामवाडा, गिरगाव परिसरात नारळी पौर्णिमेच्या दिवशी मानवी थर रचण्याचा सराव करण्यात येत होता. तसेच अनेक ठिकाणी गोविंदा पथके लाठी-काठी, तलवारबाजी, दाडपट्टा आदींची प्रात्याक्षिकेही करीत होती. यानिमित्ताने गोविंदांना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळायची. नारळी पौर्णिमेला वाद्याच्या तालावर थिरकणाऱ्या गोविंदांना ‘माखन चोर गोविंदा’ असे संबोधिण्यात येत होते. मात्र कालौघात नारळी पौर्णिमेच्या दिवशीचा सराव बंद झाला. काही मोजकीच गोविंदा पथके आणि मंडळांनी ही प्रथा सुरू ठेवली आहे. त्यापैकीच एक असलेल्या यंग उमरखाडी क्रीडा मंडळाने सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून २००३ मध्ये नारळी पौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने गोविंदा पथकांसाठी एक दिवसीय सराव शिबिराचे आयोजन सुरू केले. यंदाही उमरखाडीतील ओम बापदेव बिल्डिंगजवळ या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
आणखी वाचा-म्हाडा मुंबई मंडळ सोडत २०२३ : अजूनही १२०० अर्जदार अनामत रकमेच्या परताव्याच्या प्रतीक्षेत
‘उमरखाडीमध्ये २००३ मध्ये आयोजित केलेल्या शिबिरात मुंबईतील सुमारे ५० ते ६० गोविंदा पथके सहभागी झाली होती. गेल्या काही वर्षांपासून अन्य ठिकाणीही नारळी पौर्णिमेच्या दिवशी दहीहंडी सराव शिबिरांचे आयोजन करण्यास सुरुवात झाली आहे’, असे दहीहंडी असोसिएशनचे सरचिटणीस आणि यंग उमरखाडी क्रीडा मंडळाचे कार्याध्यक्ष कमलेश भोईर यांनी सांगितले.