मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या २०१८ सोडतीतील बाळकुम येथील प्रकल्पातील संकेत क्रमाक २७६ मधील घरांच्या योजनेतील ६८ लाभार्थ्यांना अखेर म्हाडा प्राधिकरणाने दिलासा दिला आहे. बाळकुममधील मध्यम गटातील घरांच्या किंमतीत ५ लाख ४१ हजार २८४ रुपयांनी कपात केली आहे.

यासंबंधीच्या प्रस्तावाला मागील आठवड्यात झालेल्या म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यामुळे आता बाळकुममधील घरांसाठी या ६८ लाभार्थ्यांना ५४ लाख ३३ हजार ५१६ रुपये मोजावे लागणार आहेत. म्हाडाने ६८ लाभार्थ्यांना दिलासा दिला असला तरी याच योजनेतील १२५ विजेत्यांच्या घरांची किंमती कमी करण्याच्या मागणीकडे काणाडोळा केला आहे. या विजेत्यांना कोणताही दिलासा दिलेला नाही.

हेही वाचा – आमदार निलेश लंके यांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “शरद पवार गटात प्रवेश…”

कोकण मंडळाकडून २०१८ मध्ये ९०१८ घरांसाठी सोडत काढण्यात आली होती. या सोडतीत बाळकुम गृहयोजनेत संकेत क्रमांक २७६ अंतर्गत १८४ घरांचा समावेश होता. मध्यम गटासाठी ही घरे होती. महत्त्वाचे म्हणजे १९४ पैकी १२५ घरे ही सोडतीतील अर्जदारांसाठी होती तर उर्वरित ६९ घरे ही कोकण मंडळाच्या जुन्या लाभार्थ्यांसाठी होती. कोकण मंडळाने २००० आणि २००२ ते २००६ दरम्यान जाहिरात काढून घरांसाठी अर्ज मागविले. यासाठी ७६ अर्ज सादर झाले. यातील ६९ अर्जदार पात्र ठरले. पण म्हाडाने पात्र अर्जदारांना बाळकुममध्ये प्रत्यक्षात घरे दिली नाहीत. अखेर २०१८ च्या सोडतीतील संकेत क्रमांक २७६ मध्ये या लाभार्थ्यांना समाविष्ट करण्यात आले.

हेही वाचा – पाकिस्तानातील महिलेला गोपनीय माहिती पुरवणाऱ्याला अटक

बाळकुममधील या घरांसाठी मंडळाने सोडतीत ४३ लाख ४५ हजार २३६ रुपये अशी विक्री किंमत निश्चित केली. मात्र २०२२ मध्ये या घरांच्या किंमतीमध्ये अचानक मंडळाने थेट १६ लाखांनी वाढ केली. त्यामुळे घरांची किंमती थेट ५९ लाख ७४ हजार ८०० रुपयांवर पोहोचली. याबाबत नाराजी व्यक्त करीत विजेत्यांनी न्यायालयात दाद मागितली. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच कोकण मंडळाने जुन्या ६९ लाभार्थ्यांसाठीच्या घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय दिला. मागील आठवड्यातील बैठकीत प्रस्तावाला मान्यता मिळाली.

हेही वाचा – जिंकण्याची क्षमता असेल तरच जागा मागा, शहा यांनी शिंदे-पवारांना बजावले !

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१२५ लाभार्थींना दिलासा नाहीच

म्हाडाने अखेर प्रस्ताव मंजूर करून ६८ विजेत्यांना दिलासा दिला. ६९ पैकी एका लाभार्थ्याने घर नाकारल्याने ६८ लाभार्थ्यांना आता ५४ लाख ३३ हजार ५१६ रुपयांत घरे वितरीत केली जाणार आहेत. विजेत्यांसाठी हा मोठा दिलासा आहे. मात्र त्याचवेळी सोडतीतील १२५ लाभार्थ्यांना म्हाडाने कोणताही दिलासा दिला नसल्याने ते नाराज आहेत. घरांच्या किंमती कमी करण्यासाठी न्यायालयीन लढाई सुरू असून न्यायालयाकडूनच आम्हाला न्याय मिळेल, असा विश्वास यानिमित्ताने एका विजेत्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केला आहे.